अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेची यशस्वी ‘शॉक ट्रायल’

‘शॉक ट्रायल’वॉशिंग्टन – येत्या वर्षभरात अमेरिकी नौदलाच्या सेवेत दाखल होण्याच्या तयारीत असलेल्या ‘युएसएस गेराल्ड आर फोर्ड’ या अतिप्रगत विमानवाहू युद्धनौकेच्या क्षमतेची गेल्या आठवड्यात चाचणी घेतली. अमेरिकेच्या लष्कराने २० टन स्फोटके भरलेल्या बॉम्बचा स्फोट करून या युद्धनौकेची ‘शॉक ट्रायल’ घेतली. ही चाचणी यशस्वी ठरल्याची माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली. पण या चाचणीमुळे अमेरिकेच्या पूर्वेकडील किनारपट्टीच्या भागात भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याची माहिती येत आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये युद्धनौका व आतील यंत्रणा किती स्थिर राहू शकतात, याची चाचणी घेण्यात आली होती.

गेली कित्येक वर्षे अमेरिकन नौदलाच्या जगभरातील मोहिमेत सहभागी होणार्‍या विमानवाहू युद्धनौकांच्या जागी अतिप्रगत आणि अतिविशाल विमानवाहू युद्धनौका आणण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी फोर्ड श्रेणीतील विमानवाहू युद्धनौकांची वेगाने निर्मिती होत असून यातील ‘सीव्हीएन ७८’ अर्थात ‘गेराल्ड आर फोर्ड’ या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेची सागरी चाचणी घेण्यात येत आहे. अणुऊर्जेवर आधारीत या युद्धनौकेने बहुतांश निकष गाठले आहेत. गेल्या आठवड्यात नौदलाने सदर युद्धनौकेची ‘फुल शिप शॉक ट्रायल्स-एफएसएसटी’ चाचणी घेतली.

‘शॉक ट्रायल’यानुसार, सुमारे एक लाख टन वजनाच्या या विमानवाहू युद्धनौकेजवळ २० टनाच्या बॉम्बचा स्फोट घडविला. एवढ्या शक्तीशाली स्फोटात युद्धनौकेच्या बाहेरील ढाचा तसेच आतील अणुभट्ट्या व संपर्क यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक असते. युद्धनौका किंवा आतील यंत्रणांना नुकसान झाल्यास, त्याचा मोठा फटका प्रत्यक्ष युद्धात होऊ शकतो, प्रचंडप्रमाणात जीवितहानी होऊ शकते. म्हणून युद्धनौकेसाठी शॉक ट्रायल्स महत्त्वाच्या मानल्या जातात.

दरम्यान, साधारण दहा दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने विमानवाहू युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर रशियन नौदल देखील गेल्या काही दिवसांपासून पॅसिफिक महासागरात शत्रूच्या विमानवाहू युद्धनौकांवर हल्ले चढविण्याचा सराव करीत आहे. रशियन विनाशिका अमेरिकेच्या हवाई बेटांपर्यंत पोहोचल्याचे आरोपही झाले होते. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या या शॉक ट्रायलचे गांभीर्य वाढले आहे.

leave a reply