अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 40 तालिबानी ठार

- हेल्मंडमधील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत

काबुल – अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांताची राजधानी लश्करगह हे अफगाणी लष्कर व तालिबानच्या संघर्षाचे नवे केंद्र बनले आहे. अमेरिकेने सोमवारी लश्करगहमध्ये चढविलेल्या हवाई हल्ल्यात तालिबानच्या 40 दहशतवाद्यांना ठार केले. इथे घनघोर संघर्ष सुरू असताना, अफगाणी लष्कराने स्थानिकांना हे शहर सोडून जाण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात सुरू असलेला संघर्ष स्वातंत्र्य आणि हुकूमशाही यांच्यातील संग्राम ठरतो, असे अफगाणिस्तानच्या लष्कराचे अधिकारी जनरल सामी सदात यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 40 तालिबानी ठार - हेल्मंडमधील संघर्ष तीव्र होण्याचे संकेतपाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या हेल्मंड प्रांतातील जिल्ह्यांचा तालिबानने याआधी ताबा घेतला होता. तर राजधानी लश्करगह अफगाण सरकारच्या नियंत्रणाखाली होती. पण गेल्या पाच दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानातील तीन मोठी शहरे ताब्यात घेण्यासाठी हल्ले तीव्र केले आहेत. काही तासांपूर्वी तालिबानने लश्करगह शहरातील वृत्तवाहिनी व रेडिओवाहिनीचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 40 तालिबानी ठार - हेल्मंडमधील संघर्ष तीव्र होण्याचे संकेततालिबानचे हे हल्ले मोडून काढण्यासाठी अफगाणी लष्कराला स्थानिकांचे मोठे समर्थन मिळत आहे. अफगाण सरकारने आवाहन केल्यानंतर स्थानिकांच्या ‘पब्लिक अपरायजिंग फोर्सेस-पियुएफ’ या सशस्त्र संघटनेत लश्करगहमधील नागरिकांनी सहभाग घेतल्याचे फोटो व व्हिडिओ समोर येत आहेत. सोमवारी रात्री लष्कर आणि पियुएफने रस्त्यावर उतरून मार्चपास केले व याला स्थानिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यामुळे लश्करगहमधील जनमत तालिबानविरोधात असल्याचे दिसत आहे.

या शहराच्या सुरक्षेसाठी अफगाणी जनतेप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरातून पाठिंब्याची आवश्यकता असल्याचे आवाहन जनरल सामी सदात यांनी केले. ‘हे फक्त अफगाणिस्तानचे युद्ध नाही तर स्वातंत्र्य आणि हुकूमशाहीविरोधातील संग्राम आहे. हेल्मंडची राजधानी लश्करगह तालिबानच्या हाती गेले तर त्यामुळे जगभरातील दहशतवाद्यांना उत्तेजन मिळेल. अमेरिका आणि युरोपच्या शहरांमधील छोट्या कट्टरपंथी संघटनांना बळ मिळेल व जागतिक सुरक्षेवर विनाशकारी परिणाम होईल’, असा इशारा जनरल सदात यांनी दिला.अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात 40 तालिबानी ठार - हेल्मंडमधील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत

दोन दशकांपूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी मोहिम छेडल्यानंतर हेल्मंड प्रांतातील कारवाईला सर्वाधिक महत्त्व दिले होते. कारण हेल्मंड प्रांत तालिबानचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जात होते. हेल्मंडमधील अमली पदार्थांची शेती व त्याच्या तस्करीवर तालिबानची मदार होती. त्यामुळे लश्करगहसह पूर्ण हेल्मंडचा ताबा मिळविण्यासाठी तालिबान धडका देत आहे. तर लश्करगह तालिबानच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी अफगाणी लष्कराने आपली ताकद पणाला लावली असून स्थानिक देखील अफगाणी लष्कराच्या बाजूने लढत आहेत, ही तालिबानला धक्का देणारी बाब ठरते.

leave a reply