अमेरिकेचे अफगाणिस्तानातील विशेषदूत खलिलझाद यांची भारताच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा

नवी दिल्ली – अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेष दूत झल्मे खलिलझाद यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. अफगाणिस्तान शांतीप्रकियेत भारताचेही योगदान अपेक्षित असल्याचे यावेळी खलिलझाद म्हणाले. या दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी कोरोनाव्हायरसचे संकट आलेले असताना अफगाणिस्तानला भारताने पुरविलेल्या औषधे व अन्नधान्यासाठी आभार मानले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देशाच्या विशेष मैत्रीपूर्ण संबधांचा दाखला देऊन दोन्ही देश दहशतवादाविरोधात लढा देत असल्याचे म्हटले आहे.

फ्रेबुवारी महिन्यात अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतीकरार पार पडला. त्यानंतरही अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा रक्तपात थांबलेला नाही. रविवारी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने केलेल्या हल्ल्यात अफगाणी सुरक्षा दलाचे २९ जवान ठार झाले. तसेच अमेरिका आणि अफगाणी सुरक्षा दलाचे तालिबानवरील हल्ले देखील वाढले आहेत. शांतीकरारानंतर अमेरिका आणि अफगाणी सुरक्षादलाने अफगाणिस्तानमध्ये जवळपास ५० हल्ले केल्याचा दावा तालिबानकडून केला जातो. यामुळे अमेरिका आणि तालिबानमधील शांतीकरार धोक्यात आला आहे. अशा परिस्थितीत विशेषदूत खलिलझाद आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यामध्ये झालेली चर्चा लक्ष वेधून घेत आहे.

या चर्चेत अफगाणिस्तानातील शांतीप्रकिया, तालिबानी कैद्यांची सुटका, अफगाणिस्तानातील राजकीय अस्थैर्य यावर विचारविनिमय झाला. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे अमेरिका स्वागत करीत असल्याचे यावेळी खलिलझाद म्हणाले. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी दोन अब्जाहून अधिक डॉर्लसची गुंतवणूक केली आहे. आजही भारत अफगाणिस्तानला सर्वोतोपरी सहाय्य करीत आहे. अफगाणिस्तानमध्ये कोरोनाव्हायरसची साथ फैलावत असताना भारताने अफगाणिस्तानला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, पॅरासिटामॉल आणि ७५ हजार मेट्रिक टन इतक्या गव्हाची निर्यात केली. यासाठी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचे आभार मानले. यावर बोलताना भारतीय पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबधांचा विशेष उल्लेख करून दोन्ही देश दहशतवाद विरोधात लढा देत असल्याचे म्हटले आहे.

leave a reply