साऊथ चायना सीबाबत चीनने लादलेल्या नव्या नियमांवर अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे टीकास्त्र

टीकास्त्रबीजिंग/वॉशिंग्टन/कॅनबेरा – साऊथ चायन सीवरील पकड घट्ट करण्यासाठी चीनने लागू केलेल्या नव्या नियमांवर अमेरिका व ऑस्ट्रेलियाने टीकास्त्र सोडले आहे. चीन आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नौदल चीनचे नियम धुडकावून लावेल, असे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने ठणकावले. चीनच्या नव्या नियमांनुसार, साऊथ चायना सीमधून प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांनी त्यांचे ‘कार्गो’ व ‘कॉल साईन्स’ चीनच्या यंत्रणांना रिपोर्ट करायच्या आहेत. यापूर्वीही चीनने नकाशे बदलणे, कृत्रिम बेटे उभारणे, सागरी क्षेत्रातील हक्क दाखविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे यासारख्या अनेक माध्यमांमधून साऊथ चायना सीवरील पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या दशकात फिलिपाईन्सचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री अल्बर्ट डेल रोझारिओ यांच्या नेतृत्त्वाखाली चीनच्या साऊथ चायना सीमधील दाव्यांविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा ठोकण्यात आला होता. या दाव्याचा निकाल फिलिपाईन्सच्या बाजूने लागला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी’नुसार फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रातील विशेष आर्थिक क्षेत्राला मान्यता दिली होती. त्यामुळे संपूर्ण ‘साऊथ चायना सी’ आपल्या मालकीचा आहे, या चीनच्या दाव्यांना धक्का बसला होता. त्यानंतर चीनने वेगवेगळ्या माध्यमातून ‘साऊथ चायना सी’वरील आपला हक्क दाखविण्यासाठी पावले उचलली असून नवा नियम त्याचाच भाग मानला जातो.

चीनच्या ‘मेरिटाईम सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशन’ने नवा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार साऊथ चायना सीमधून प्रवास करणाऱ्या परदेशी जहाजांना त्यावर असलेले सामान व ‘कॉल साईन्स’ यांची माहिती चिनी यंत्रणांना द्यायची आहे. चिनी यंत्रणांनी त्याला परवानगी दिल्यानंतर सदर परदेशी जहाजांना साऊथ चायना सीमधून प्रवास करता येणार आहे. या जहाजांमध्ये युद्धनौका, पाणबुड्या यांच्यासह मोठ्या मालवाहू जहाजांचा समावेश आहे. परदेशी जहाजांनी याचे उल्लंघन केल्यास चीनची संरक्षणदले त्याविरोधात कारवाई करु शकतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

टीकास्त्रचीनच्या या मनमानीविरोधात अमेरिका व ऑस्ट्रेलियाने टीकास्त्र सोडले. ‘सागरी हद्द असलेल्या कोणत्याही देशाचा कायदा अथवा नियम, आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार जगातील इतर देशांना दिलेला मुक्त प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. साऊथ चायना सीसह इतर सागरी क्षेत्रावर बेकायदेशीर रितीने केलेले दावे सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी धोकादायक आहेत. अशा स्वरुपाच्या हालचाली साऊथ चायना सी क्षेत्र व नजिकच्या देशांचे हितसंबंध, मुक्त व्यापार तसेच दळणवळणाच्या अधिकारांचे उल्लंघन ठरतात’, अशी टीका अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केली आहे.

‘चीनच्या नव्या नियमांची आम्हाला कल्पना आहे. असे नियम आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सीशी सुसंगत असणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाचे नौदल हे नियम धुडकावून लावेल. ऑस्ट्रेलियाच्या युद्धनौका आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सागरी क्षेत्रातील वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा हक्क बजावतील’, असे ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण विभागाने बजावले.

दरम्यान, चीनचे अमेरिकेतील राजदूत किन गँग यांनी, अमेरिकेच्या शीतयुद्धकालिन मानसिकतेला लक्ष्य केले आहे. अमेरिकेच्या यापूर्वीच्या प्रशासनाने चीनविरोधात टोकाची भूमिका घेतली होती व नव्या प्रशासनानेही ती पुढे कायम ठेवली आहे, असा आरोप गँग यांनी केला. अमेरिकेतील एका अभ्यासगटाच्या कार्यक्रमात चिनी राजदूतांनी, चीन म्हणजे सोव्हिएत रशिया नाही, असा दावाही केला. सोव्हिएत रशियन संघराज्य त्यांच्यातील अंतर्गत कमकुवतपणामुळे कोसळले, असे वक्तव्य करून चिनी राजदूतांनी आपला देश त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली असल्याचा इशारा अमेरिकेला दिला आहे.

leave a reply