अमेरिका, युरोपिय महासंघाच्या तैवानबरोबरील सहकार्यात वाढ

वॉशिंग्टन/ब्रुसेल्स/तैपेई – तैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप खपवून घेणार नसल्याचा इशारा चीनने दिला. पण शेजारी देशांवर एकाधिकारशाही राबविणार्‍या चीनच्या या इशार्‍याची आपण पर्वा करीत नसल्याचे अमेरिका आणि युरोपिय महासंघाने दाखवून दिले. अमेरिकेने तैवानसाठी रविवारी कोरोनाप्रतिबंधक लसीचे २५ लाख डोस रवाना केले. ही संख्या अमेरिकेने घोषित सहाय्याच्या तिप्पट आहे. तर युरोपिय महासंघाच्या काऊन्सिलने प्रवासबंदीतून वगळलेल्या देशांची यादी जाहीर केली असून यामध्ये चीन आणि तैवानचा नावासह स्वतंत्र उल्लेख आहे. त्याचबरोबर तैवानचा ध्वजही यामध्ये दाखविण्यात आलेला आहे.

नुकतीच लंडनमध्ये पार पडलेली जी७ आणि त्यानंतर ब्रुसेल्स येथील नाटोच्या बैठकीत, कोरोनाचे उगमस्थान, तैवान, इंडो-पॅसिफिक या मुद्यांप्रकरणी चीनविरोधात भूमिका स्वीकारली होती. या बैठकीत लोकशाहीवादी देशांनी चीनच्या एकाधिकारशाहीवर सडकून टीका करून तैवानला पाठिंबा दिला होता. यामुळे बिथरलेल्या चीनने तैवानच्या हद्दीत २८ विमानांची घुसखोरी घडवून पाश्‍चिमात्य देशांना इशारा दिला. तैवान हा चीनचा सार्वभौम भूभाग असून याप्रकरणी परदेशी हस्तक्षेप कदापि खपवून घेणार नसल्याचे चीनने धमकावले होते.

पण तैवानला कोरोनाप्रतिबंधक लस पुरवून अमेरिकेने चीनच्या इशार्‍याची पर्वा करीत नसल्याचे दाखवून दिले. अमेरिकेतून कोरोनाप्रतिबंधक लसींचे २५ लाख डोस घेऊन निघालेले विमान रविवारी तैवानमध्ये दाखल झाले. याआधी अमेरिकेने तैवानला ७.५ लाख डोस पुरविण्याचे आश्‍वासन दिले होते. घोषणेच्या तिपटीहून अधिक डोस अमेरिकेने तैवानसाठी रवाना केले. या संकटाच्या काळात केलेल्या या सहाय्याबद्दल तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे आभार व्यक्त केले. तसेच या सहकार्यामुळे आपल्यातील मैत्री अधिक दृढ झाल्याचा विश्‍वास तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला.

‘राजकीय किंवा आर्थिक अटींवर अमेरिका हे सहाय्य पुरवित नाही. आमच्या या व्हॅक्सिन सहाय्यामागे कसलेही छुपे हेतू नाहीत. मानवी जीवन वाचविण्याच्या एकमेव उद्देशाने आम्ही हे सहाय्य पुरवित आहोत’, असे सांगून अमेरिकेने चीनच्या व्हॅक्सिन डिप्लोमसीला लक्ष्य केले. याआधी चीनने तैवानला कोरोना प्रतिबंधक लसी पुरविण्याचे तयारी केली होती. पण चीनच्या व्हॅक्सिनवर विश्‍वास नसलेल्या तैवानने सदर सहाय्य नाकारले होते.

अमेरिकेने तैवानला दिलेल्या या सहाय्यावर चीनने ताशेरे ओढले. ‘लस सहकार्याच्या नावाखाली अमेरिकेने राजकीय फेरफार करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच चीनच्या अंतर्गत राजकारणात दखल देऊ नये’, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियांग यांनी केली.

युरोपिय महासंघाच्या काऊन्सिलने मोठी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून लादलेली प्रवासबंदी महासंघाने शिथिल केली आहे. यानुसार महासंघाने १७ देश आणि प्रशासकीय प्रदेशांना प्रवासबंदीतून वगळले. यामध्ये चीनप्रमाणे तैवानचा नावासह उल्लेख व ध्वज दाखविला आहे. दोन दिवसांपूर्वी युरोपिय महासंघाच्या संसद सदस्यांनी तैवानमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अमेरिकेप्रमाणे महासंघाने देखील तैवानमध्ये व्यापारी गुंतवणूक करावी, असे या सदस्यांनी सुचविले होते.

दरम्यान, तैवानप्रकरणी अमेरिका रेड लाईन ओलांडत असल्याचा इशारा चीनने याआधी दिला होता. पण आता अमेरिकेपाठोपाठ युरोपिय महासंघ देखील तैवानबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली करू लागल्यामुळे चीनच्या चिंतेत भर पडली आहे.

leave a reply