अमेरिकेकडून चीनच्या ३३ कंपन्या ‘ब्लॅकलिस्ट’

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने चीनच्या लष्कराशी संबंधित असलेल्या तब्बल ३३ कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकले आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सुरू राजनैतिक युद्धात चीनला दिलेला जबरदस्त धक्का ठरतो. अमेरिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांमध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ व ‘फेशिअल रेकग्निशन’ क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे.

शुक्रवारी अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने ३३ चिनी कंपन्यांना काळ्या यादीत टाकल्याचे जाहीर केले. त्यात ‘किहू३६०’, ‘क्लाऊड माईंडस’ व ‘नेट पोसा’ यासारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या व यादीत टाकलेल्या बहुतांश कंपन्या चीनच्या लष्कराशी संबंधित आहेत. यातील काही कंपन्यांचा वापर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने उघुरवंशीय मुस्लिमांवर टेहळणीसाठी केल्याचेही उघड झाले आहे.

अमेरिकेने चिनी कंपन्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याची गेल्या सात महिन्यातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेने २८ कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते. त्यात ‘हाईक व्हिजन’ या ‘व्हिडीओ सर्व्हिलन्स’ क्षेत्रावरील बड्या कंपनीचा समावेश होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही वर्षांत आर्थिक व व्यापारी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘हुवेई’सारख्या कंपनीवरील कारवाईबाबत त्यांनी घेतलेले निर्णय व चीनविरोधात स्वीकारलेला संघर्षाचा पवित्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेणारा ठरला होता. कोरोना साथीच्या मुद्यावरही ट्रम्प व अमेरिकी प्रशासनातील इतर नेत्यांनी चीनला लक्ष्य केले असून उघड राजनैतिक युद्ध पुकारले आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने केलेली कारवाई ट्रम्प प्रशासनाकडून चीनविरोधातील राजनैतिक युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply