चीनच्या तैवानसंदर्भातील कोणत्याही निर्णयात अमेरिका हस्तक्षेप करु शकत नाही

- लष्करी प्रवक्त्यांचा इशारा

बीजिंग/वॉशिंग्टन/तैपेई – तैवानसंदर्भात चीनकडून घेण्यात येणार्‍या निर्णयात अमेरिका हस्तक्षेप करु शकत नाही, असे चीनच्या लष्करी प्रवक्त्यांनी बजावले आहे. त्याचवेळी तैवानसमोर चीनबरोबरील विलिनीकरण हा एकमेव पर्याय असून तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण ठरेल, असा इशाराही संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुओकिआंग यांनी दिला. अमेरिकी सिनेटर्सचा तैवान दौरा, कोरोना लसींचा पुरवठा व त्यापाठोपाठ विनाशिकेची गस्त यामुळे चीन अस्वस्थ असून नवी धमकी त्यावर उमटलेली प्रतिक्रिया असल्याचे दिसत आहे.

चीनच्या तैवानसंदर्भातील कोणत्याही निर्णयात अमेरिका हस्तक्षेप करु शकत नाही - लष्करी प्रवक्त्यांचा इशारा‘चीनकडून तैवानसंदर्भात सुरू असलेल्या हालचालींना कोणीही रोखू शकत नाही. अमेरिकेने ही बाब ध्यानात ठेवावी. त्याचवेळी अमेरिका व तैवानमधील राजनैतिक पातळीवरील कोणत्याही प्रकारची अधिकृत देवाणघेवाण अथवा लष्करी संबंधांना चीनचा ठाम विरोध आहे, हे देखील लक्षात ठेवावे’, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते गुओकिआंग यांनी दिला. तैवानपुढे चीनशी विलिनीकरण हा एकमेव मार्ग उपलब्ध असून तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण असेल. त्यासाठी अमेरिकेचे सहाय्य घ्याल तर अपयशीच ठराल, अशा शब्दात चिनी प्रवक्त्यांनी पुढे धमकावले.

यावेळी चीनने तैवानच्या हद्दीतील विमानांच्या घुसखोरीचेही समर्थन केले. तैवानच्या सागरी क्षेत्रातील स्थितीचा विचार करून तसेच सार्वभौमत्त्वाच्या सुरक्षेसाठी चीनच्या लढाऊ विमानांनी सराव केला होता, असा दावा संरक्षण प्रवक्ते रेन गुओकिआंग यांनी केला. गेल्या आठवड्यात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) तब्बल 28 विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले होते. चिनी विमानांनी आतापर्यंत केलेल्या घुसखोरीतील ही सर्वात मोठी घुसखोरी ठरली होती.
सध्या अमेरिका व चीनमध्ये जबरदस्त तणाव असून तैवान हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 2019 साली एका कार्यक्रमात उघडपणे तैवान ताब्यात घेण्यासाठी सर्व पर्याय वापरले जातील, असा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेने आपले धोरण अधिक आक्रमक करून तैवानच्या सागरी क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्या होत्या. त्याला राजनैतिक दौरे व इतर निर्णयांची जोड देऊन अमेरिकेने तैवान मुद्यावर चीनला शह देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या तीन सिनेटर्सनी तैवानला भेट दिली होती. त्यानंतर ‘जी7’ व ‘नाटो’च्या बैठकीत अमेरिकेसह प्रमुख देशांनी चीनवर टीकास्त्र सोडून तैवानला उघड पाठिंबा दर्शविला होता. अमेरिकेने तैवानला कोरोनाच्या लाखो लसी देण्याची घोषणाही केली आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेच्या विनाशिकेने तैवाननजिकच्या सागरी क्षेत्रातून गस्त घातल्याची माहितीही समोर आली होती. अमेरिकेकडून तैवानसाठी सुरू असलेल्या या वाढत्या हालचालींमुळे चीन अधिकच बिथरला असून लष्करी पातळीवरून अधिक आक्रमक वक्तव्ये करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

leave a reply