अमेरिकी सेंटकॉमच्या प्रमुखांचा तालिबान विश्‍वासार्ह नसल्याचा दावा

वॉशिंग्टन/अंकारा – ‘अमेरिकेने अफगाणिस्तानातील संपूर्ण सैन्यमाघारीनंतर तालिबान दिलेल्या आश्‍वासनांचे पालन करील का? तालिबानच्या विश्‍वासार्हतेबाबत मला संशय वाटत आहे’, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी म्हटले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अल कायदा किंवा आयएसच्या धोक्यांची अमेरिकेला सूचना देणारी यंत्रणा कोलमडून पडेल, असा इशारा जनरल मॅकेन्झी यांनी दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी देखील बायडेन प्रशासनाच्या सैन्यमाघारीच्या घोषणेवर टीका केली. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर क्रूर तालिबानी महिला व मुलींवर भयंकर अत्याचार करतील, अशी चिंता बुश यांनी व्यक्त केली आहे.

पुढच्या महिन्यापासून अफगाणिस्तानातून अमेरिकेची सैन्यमाघार सुरू करून ११ सप्टेंबरच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या आठवड्यात स्पष्ट केले. बायडेन यांच्या या घोषणेबाबत अमेरिकेतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीसमोर बोलताना ‘सेंट्रल कमांड -सेंटकॉम’चे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी बायडेन यांच्या या घोषणेबाबत आपली मते परखडपणे मांडली.

सर्वात आधी जनरल मॅकेन्झी यांनी तालिबानच्या विश्‍वासार्हतेवर गंभीर शंका उपस्थित केली. ‘तालिबानच्या मागणीनुसार, अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतली, तर तालिबान देखील अमेरिकेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करील का, यावर अमेरिकेच्या लष्कराचे निरिक्षण असेल’, असे जनरल मॅकेन्झी यांनी स्पष्ट केले.

याशिवाय तालिबान आणि आयएसचा मुद्दाही मॅकेन्झी यांनी उपस्थित केला. ‘अमेरिकेवर हल्ले चढविण्याची अल कायदाची महत्त्वाकांक्षा संपलेली नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अल कायदा आणि आयएसपासून असलेल्या धोक्यांची सूचना देणारी यंत्रणा कोलमडून पडू शकते. तसेच सैन्यमाघारीनंतर या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची वेळ आलीच तर अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्येही अमेरिकेचे लष्करी तळ नाही’, याची आठवण मॅकेन्झी यांनी करून दिली.

दरम्यान, बायडेन यांच्या सैन्यमाघारीच्या घोषणेवर ताशेरे ओढून तालिबानने तुर्कीमध्ये आयोजित केलेल्या अमेरिका पुरस्कृत चर्चेतून माघार घेतली आहे. येत्या शनिवारी अंकारा येथे ही चर्चा होणार होती. यामध्ये अफगाणिस्तानच्या सरकारसह अमेरिका, भारत, रशिया, चीन, पाकिस्तान व इराणचे प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. पण तालिबाननेच माघार घेतल्यानंतर तुर्कीने सदर बैठक पुढे ढकलली आहे.

leave a reply