इस्लामाबाद व कराचीवर अमेरिकेच्या चिनूक हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या

- पाकिस्तानची जनता धास्तावली

चिनूकइस्लामाबाद – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हजारो अमेरिकन सैनिक दाखल झाल्याचे उघड झाल्यानंतर पाकिस्तानी जनता धास्तावली आहे. याला काही दिवस उलटत नाही तोच, अमेरिकन हवाई दलाची चिनूक हेलिकॉप्टर्स इस्लामाबाद व कराचीवर घिरट्या घालत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पाकिस्तानात नक्की काय चालले आहे? असा सवाल या देशाची माध्यमे करीत आहेत. इतकेच नाही तर अमेरिका अफगाणिस्तानातील परिस्थितीला जबाबदार असल्याचे खापर पाकिस्तानवर फोडून जबरदस्त कारवाई करील, या भीतीने काही पाकिस्तानी विश्‍लेषकांची गाळण उडली आहे.

इस्लामाबादच्या हॉटेल्समध्ये अमेरिकन सैनिकांचे वास्तव्य आहे. या हॉटेलमधून पाकिस्तानी नागरिकांना तातडीने बाहेर काढून इथे अमेरिकी सैनिकांना ठेवण्यात आले हेोते. सोशल मीडियावर याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले व त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारने याची कबुली दिली. पण अमेरिकन सैनिकांचे इथले वास्तव्य अवघ्या 21 ते 30 दिवसांचेच असेल, असे पाकिस्तानच्या सरकारने जाहीर केले. पण अमेरिकेला लष्करी तळ देणार नाही, असे ठासून सांगणाऱ्या पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकन सैनिकांना इस्लामाबादमध्ये येण्याची परवानगी कशी काय दिली? याचे उत्तर पाकिस्तानच्या सरकारने दिलेले नाही.

त्यातच राजधानी इस्लामाबाद व कराची या शहरांवर अमेरिकेची चिनूक हेलिकॉर्प्स घिरट्या घालत आहे. याचे व्हिडिओज्‌ पाकिस्तानी नागरिकांनीच तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. यामुळे इम्रानखान यांचे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. याच्या बरोबरीने पॉलिटिको या अमेरिकन नियतकालिकाने केलेला दावा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये गाजत आहे. अल कायदा व आयएस-खोरासान या दहशतवादी संघटनांवर कारवाईसाठी अमेरिकेने पाकिस्तानवरचा दबाव वाढविला आहे. ही माहिती देणारी गोपनीय कागदपत्रे उघड झाली असून यामुळे पाकिस्तानची अधिकच कोंडी झाल्याचे दिसते.

चिनूकआत्तापर्यंत दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानने अमेरिकेला साथ दिल्याचा आभास निर्माण करून प्रत्यक्षात दहशतवादी संघटनांचा बचाव केला होता. तालिबानला अफगाणिस्तानात मिळालेले यश हे पाकिस्तानने केलेल्या विश्‍वासघाताचे फलित असल्याचा आरोप अमेरिकेचे वरिष्ठ नेते करीत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने अल कायदा व आयएस-खोरासान सारख्या दहशतवादी संघटनांवर कारवाईसाठी पाकिस्तानवर टाकलेले दडपण निराळेच संकेत देत आहे. दहशतवाद्यांशी संबंध असलेला अण्वस्त्रधारी पाकिस्तान पूर्णपणे चीनच्या वर्चस्वाखाली जाऊ नये, यासाठी अमेरिक प्रयत्नशील असल्याचे या कागदपत्रांमुळे उघड झाले आहे. त्याचवेळी सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तान सोडण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेच्या सैनिक व नागरिकांना केलेले सहाय्य अमेरिका विचारात घेत नसल्याची तक्रारही या कागदपत्रामध्ये नोंदविण्यात आलेली आहे.

ज्यो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली नाही. इतकेच नाही तर अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर पाकिस्तानने केलेल्या सहाय्याची विशेष दखल अमेरिकेने घेतलेली नाही. पण अफगाणिस्तानातून बाहेर पडलेले अमेरिकेचे सैन्य मात्र पाकिस्तानच्या राजधानीत वास्तव्य करीत आहे. ही पाकिस्तानसाठी अतिशय धोकादायक बाब ठरते. पुढच्या काळात इस्लामाबादमध्ये काहीतरी विपरित घडेल, अशी चिंता पाकिस्तानी विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. इतकेच नाही तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून घेतलेली माघार पाकिस्तानची वाट लावण्यासाठीच असल्याची भीती एका विश्‍लेषकाने व्यक्त केली आहे.

leave a reply