अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता घोषित करील

अमेरिकेचे विश्‍लेषक मायकल रूबिन

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेसाठी पाकिस्तानचे महत्त्व संपलेले असेल. त्यामुळे पुढच्या काळात अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता देश घोषित करील, असा निष्कर्ष विश्‍लेषक मायकल रूबिन यांनी नोंदविला आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असेलल्या पेंटॅगॉनचे माजी अधिकारी व सध्या अमेरिकन इंटरप्राईझ इन्स्टीट्युट या अभ्यासगटाचे विश्‍लेषक असलेल्या रूबिन यांचा हा दावा पाकिस्तानचा थरकाप उडविणारा आहे. याआधीही पाकिस्तानातील काही पत्रकार व विश्‍लेषकांनी अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार पाकिस्तानसाठी घातक ठरेल, असे बजावले होते.

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या ज्यो बायडेन यांनीही हा सैन्यमाघारीचा निर्णय कायम ठेवला. मात्र ही सैन्यमाघार १ मे च्या ऐवजी ११ सप्टेंबर रोजी पूर्ण होईल, असे बायडेन यांनी जाहीर केले होते. अमेरिकेसारखी महासत्ता अफगाणिस्तानातून पराभूत होऊन बाहेर पडत आहे, हा तालिबानचा मोठा विजय ठरतो, असे सांगून पाकिस्तानातील काही कट्टरपंथियांची बाजू उचलून धरणारे पत्रकार व विश्‍लेषक त्यावर समाधान व्यक्त करीत होते. तसेच अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबान काही आठवड्यातच अफगाणिस्तानचा ताबा घेईल आणि त्यानंतर काश्मीरसाठी भारताविरोधात भीषण युद्ध छेडले जाईल, अशी स्वप्ने या कट्टरपंथियांकडून पाहिली जात होती.

पण अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर अमेरिकेसाठी पाकिस्तानचे महत्त्व संपुष्टात येईल आणि त्याचे विघातक परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, असे मायकल रूबिन यांनी बजावले आहे. अफगाणिस्तानात सैन्य तैनात असताना, रसद पुरविण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या मार्गाची गरज होती. ही गरज सरल्यानंतर, अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता देश घोषित करू शकतो. कारण अफगाणिस्तानात तालिबानने भयंकर कारवाया केल्या, तर आजवर तालिबानची पाठराखण करणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात जनमत जाईल. अमेरिकन लोकप्रतिनिधी देखील पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका स्वीकारतील. यानंतर अमेरिकन संसदेकडून परराष्ट्र मंत्रालयावर पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करा, असे दडपण टाकले जाईल, असा दावा रूबिन यांनी केला.

असे घडून नये यासाठी अमेरिकेतील पाकिस्तानची लॉबी प्रयत्नांची पराकाष्टा करील, पण त्याचा उपयोग होणार नाही, असेही रूबिन पुढे म्हणाले. म्हणूनच पाकिस्तानने आता इराण, सिरिया, उत्तर कोरिया या देशांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची तयारी केलेली बरी, असा सल्ला मायकल रूबिन यांनी दिला आहे. दरम्यान, अमेरिकन सिनेटर जॅक रिड यांनी दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानवर घणाघाती आरोपांची फैर झाडली होती.

पाकिस्तानातील सुरक्षित आश्रयस्थानांमुळेच तालिबानला अफगाणिस्तानात अमेरिकेच्या विरोधात यश मिळाले. अमेरिकेने पाकिस्तानातील तालिबानच्या या आश्रयस्थानांवर हल्ले चढविले नाहीत, म्हणूनच तालिबानचे फावले. कारण पाकिस्तान या दहशतवादविरोधी युद्धात दोन्ही बाजूने खेळत होता. तसे करून पाकिस्तानने अमेरिकेचा विश्‍वासघात केला आणि याकडे दुर्लक्ष करणे ही अमेरिकेची सर्वात मोठी चूक ठरली, असे अमेरिकन सिनेटर जॅक रिड यांनी म्हटले होते. अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे अध्यक्ष असलेल्या जॅक रिड यांनी केलेले आरोप अमेरिकेचे पाकिस्तानबाबतचे धोरण यापुढे कठोर होईल, असे संकेत देत आहेत. त्याचवेळी अमेरिका पाकिस्तानवरील दडपण वाढवित चालल्याची बाबही यामुळे स्पष्ट होत आहे.

अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ हवा आहे आणि या तळावर सैन्य तैनात ठेवून अफगाणिस्तानवर नजर ठेवण्याची अमेरिकेची योजना आहे, असे दावे केले जातात. मात्र अमेरिकेला हा तळ उपलब्ध करून दिल्यास आत्तापर्यंत अफगाणिस्तानातील युद्धात अमेरिकेचा विश्‍वासघात करून पाकिस्तानने जे काही कमावले, ते सारे गमावण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेला तळ दिल्यास तालिबानचे दहशतवादी पाकिस्तानकडे शत्रूदेश म्हणूनच पाहतील. त्याचवेळी चीन व इराण हे देश पाकिस्तानला कडाडून विरोध करतील. तर अमेरिकेला तळ देण्यास पाकिस्तानने नकार दिल्यास पाकिस्तानची अर्थव्यवस्था अधिकच गाळात रूतेल. तसेच रूबिन यांच्या दाव्यानुसार अमेरिका पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करू शकेल. वेगवेगळ्या मार्गाने अमेरिका पाकिस्तानला याची जाणीव करून देत आहे.

leave a reply