अमेरिकेच्या संरक्षणदलांनी चीनच्या धोक्याला प्राधान्य द्यावे – संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांचे निर्देश

वॉशिंग्टन/बीजिंग – चीन व चीनचे लष्कर हा अमेरिकेच्या सुरक्षेसाठी पहिल्या क्रमांकाचा धोका असून या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षणदलांनी प्राधान्य द्यावे, असे निर्देश अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिले आहेत. अमेरिकेच्या उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांनीही त्याला दुजोरा दिला असून, 2022 सालच्या ‘डिफेन्स बजेट’मधील मोठा हिस्सा चीनला रोखण्यासाठी वापरला जाईल, असे वक्तव्य केले आहे. संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन व उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांचे उद्गार अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नव्या ‘डायरेक्टिव्ह’चा भाग असल्याचे सांगण्यात येते.

लॉईड ऑस्टिनमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली 2018 साली प्रसिद्ध झालेल्या ‘नॅशनल डिफेन्स पॉलिसी’मध्ये चीनच्या वाढत्या लष्करी धोक्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकी संरक्षणविभाग व गुप्तचर यंत्रणांनी सादर केलेल्या विविध अहवालांमध्येही चीनचा धोका कशा रितीने वाढत चालले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने यादृष्टीने संरक्षणखर्चात वाढ करून नौदल व हवाईदलासह आण्विक क्षमता वाढविण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवातही केली होती.

या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी स्वतः संरक्षणविभागाला चीनच्या धोक्याबाबत निर्देश देणे महत्त्वाचे ठरते. संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिलेले निर्देश संरक्षण विभागाच्या टास्क फोर्सकडून आलेल्या अहवालांची परिणिती असल्याचे सांगण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात संरक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना करून शिफारशी मागविल्या होत्या. या शिफारशी संरक्षणमंत्र्यांना सादर करण्यात आल्या असून त्यानंतर ऑस्टिन यांनी विशेष निर्देश देणारे निवेदन जारी केल्याची माहिती संरक्षणसूत्रांनी दिली.

लॉईड ऑस्टिनअवघ्या 24 तासांपूर्वीच अमेरिकेच्या संसदेेने चीनच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावाला रोखण्यासाठी स्वतंत्र विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता संरक्षण विभागाचे आलेले निर्देश अमेरिकेतील राजकीय तसेच लष्करी वर्तुळात चीनविरोधी भावना प्रबळ होत असल्याचे संकेत देणारे ठरतात. संरक्षणविभागाला देण्यात आलेल्या नव्या निर्देशांमध्ये अनेक नव्या कार्यक्रमांचा समावेश असून सध्या त्याची माहिती गोपनीय असल्याचे सांगण्यात आले आहे.

नव्या निर्देशांनुसार, चीनच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका आपल्या संरक्षणक्षमता वाढविण्याबरोबरच सहकारी व भागीदार देशांचे नेटवर्क मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 2022 सालासाठी 715 अब्ज डॉलर्सचे बजेट सादर केले असून त्यातही चीनच्या धोक्याला समोर ठेऊन योजना मांडण्यात आल्या असल्याचे उपसंरक्षणमंत्री कॅथलीन हिक्स यांनी म्हटले आहे.

leave a reply