अमेरिकेचा मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करार

वॉशिंग्टन – हिंदी महासागरातील शांतता व सुरक्षेसाठी अमेरिकेने भारताच्या शेजारी मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करार केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठी या क्षेत्रातील देशांबरोबर सहकार्य वाढविण्याची भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर मालदीवसोबत सदर सहकार्य प्रस्थापित केल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने दिली.

संरक्षण सहकार्य

अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयच्या ‘दक्षिण आणि आग्नेय आशियाई’ विभागाचे उप संरक्षणमंत्री रीड वर्नर आणि मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दिदी यांच्यात १० सप्टेंबर रोजी या संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ‘हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देश्याने उभय देशांनी मैत्री घट्ट करण्यासह संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरतो आहे’, अशी माहिती पेंटॅगॉनने दिली. मालदीवच्या संरक्षणंत्री मारिया दिदी यांनी अमेरिकेबरोबर झालेल्या या संरक्षण सहकार्य कराराचे स्वागत केले. अमेरिकेबरोबरचे हे संरक्षण सहकार्य मालदीवसाठी मैलाचा दगड असल्याचे संरक्षणमंत्री दिदी यांनी म्हटले आहे.

संरक्षण सहकार्यहिंदी महासागर क्षेत्रातील वाढती चाचेगिरी, कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका त्याचबरोबर बेकायदेशीर सागरी व्यापार रोखण्यासाठी अमेरिकेबरोबरचे हे सहकार्य सहाय्य्क ठरेल, मालदीवच्या संरक्षणमंत्री म्हणाल्या. त्याचबरोबर कोरोनाव्हायरसच्याविरोधात लढण्यासाठी देखील अमेरिका मालदीवला मदत करणार असल्याची माहिती संरक्षणमंत्री दिदी यांनी दिली. तर या द्विपक्षीय करारांतर्गत अमेरिका मालदीवला सागरी सहकार्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती आणि मानवदावादी सहाय्य पुरविणार आहे. त्याचबरोबर या सहकार्याच्या वृद्धीसाठी नियमितपणे उभय देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक, चर्चा होत राहतील, असे पेंटॅगॉनने स्पष्ट केले.

दरम्यान, भारताच्या शेजारी असलेल्या मालदीवला आपल्या कर्जाच्या जाळ्यात ओढून भारताविरोधातच ‘स्टिंग ऑफ पर्ल’चे जाळे मजबूत करण्याची चीनची योजना होती. यासाठी २०१८ सालापर्यंत चीनने मोठे प्रयत्न केले होते. पण, २०१८ साली मालदीवमध्ये नवीन सरकार आल्यानंतर चीनसोबत कोणताही मोठा करार करण्यात आला नाही. याउलट येथील सरकारने भारताबरोबरच्या जुन्या सहकार्याची आठवण ठेवून चीनच्या मनसुब्यांना धक्का दिला होता. त्यातच आता मालदीवने अमेरिकेसोबतही करार केल्यामुळे चीनला मोठा हादरा बसला आहे.

leave a reply