सुरक्षित सैन्यमाघारीसाठी अमेरिका अफगाणिस्तानात नवी तैनाती करणार

- पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय

वॉशिंग्टन/काबुल – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी १ मे पासून अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेण्याची घोषणा केली आहे. पण ही सैन्यमाघार सुरू करण्याआधी आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी अमेरिका अफगाणिस्तानात अतिरिक्त तैनाती करील, अशी घोषणा पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी केली. त्याचबरोबर ही माघार सुरू असताना अमेरिकी जवानांवर दहशतवादी हल्ला झालाच तर त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा किरबाय यांनी दिला.

अफगाणिस्तानातील उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सैन्यमाघारीची घोषणा केली. यानुसार, येत्या १ मे पासून ही सैन्यमाघार सुरू होणार असून ११ सप्टेंबरच्या आधी ती पूर्ण होईल, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले होते. अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिकेच्या २५०० जवानांबरोबर नाटोचे सात हजार जवान देखील या कालावधीत माघार घेणार आहेत. पण अमेरिकेच्या घोषणेवर खवळलेल्या तालिबानने पाश्‍चिमात्य देशांच्या जवानांवर हल्ले चढविण्याची धमकी दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अफगाणिस्तानातून माघार सुरू होण्याआधी येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पेंटॅगॉनचे प्रवक्ते किरबाय यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ‘तालिबानच्या धमक्यांची तीव्रता आपण पाहिली आहे. त्यामुळे त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही’, असे किरबाय यांनी सांगितले. त्याचबरोबर माघार?घेणार्‍या अमेरिका किंवा मित्रदेशांच्या जवानांवर हल्ले झाले तर त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळेल. याबाबत राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दिलेला इशाराही तालिबानने विसरू नये, असे करबाय यांनी धमकावले.

अमेरिकेने सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर गेल्या चोवीस तासात तालिबान आणि अफगाणी लष्करात पेटलेल्या संघर्षात किमान ५० जण ठार झाले आहेत. यामध्ये ४२ तालिबानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. याशिवाय अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत तालिबानच्या कैदेतून २० जवानांची सुटका केली आहे.

दरम्यान, अमेरिकेने जाहीर केलेल्या सैन्यमाघारीवर अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मोहम्मद मोहाकिक यांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेची ही सैन्यमाघार अफगाणिस्तानाला गृहयुद्धात ढकलू शकते. दहशतवादी संघटना अधिक मजबूत बनतील, असा इशारा मोहकिक यांनी दिला.

leave a reply