कोरोनाची लस आल्यानंतर अमेरिकी डॉलर कोसळू शकतो

अमेरिकी डॉलरवॉशिंग्टन – येत्या काही महिन्यात येणाऱ्या कोरोना साथीवरील लसी व साथीच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून कायम ठेवण्यात येणारे पतधोरण या घटकांमुळे पुढील वर्षात डॉलर तब्बल 20 टक्क्यांनी कोसळू शकतो, असा दावा आघाडीची वित्तसंस्था ‘सिटीबँक’ने केला आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेतील आघाडीचे गुंतवणूकदार पीटर शिफ यांनीही डॉलर कोसळण्याचे भाकित वर्तविताना त्याची जागा सोने घेऊ शकते, असे म्हटले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्यचे शेअरबाजारातील घडामोडी तसेच इतर आकडेवारीवरून समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर सिटीबँकसारख्या आघाडीच्या वित्तसंस्थेने डॉलर कोसळण्याचा दावा करणे, लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 1 कोटी 16 लाखांवर जाऊन पोहोचली असून अडीच लाखांहून अधिक जण दगावले आहेत. अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये साथीची दुसरी लाट आल्याचे उघड होत असून त्याची व्याप्ती रोखण्यासाठी आणीबाणी तसेच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या घडमोडी सुरू असतानाच, गेल्या काही दिवसात कोरोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न करणाऱ्या तीन मोठ्या कंपन्यांनी आपली लस अधिक प्रभावी असल्याचे दावे केले आहेत.

अमेरिकी डॉलर

या कंपन्यांमध्ये अमेरिकेतील ‘मॉडर्ना’, ‘फायझर’ व ब्रिटनमधील ‘ॲस्ट्राझेनेका’ या कंपन्यांचा समावेश आहे. तीनही कंपन्यांनी आपली लस 90 टक्के व त्याहून अधिक प्रभावी असल्याचे सांगून आवश्‍यक यंत्रणांची परवानगी मिळाल्यास या वर्षाच्या अखेरपर्यंत कोट्यवधी डोस तयार करु शकतो, असे म्हटले आहे. या कंपन्यांव्यतिरिक्त रशिया व चीननेही आपली लस अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून निर्मितीची तयारी झाल्याचे सांगितले आहे. लसीसंदर्भातील या दाव्यांमुळे पुढील वर्षापासून प्रमुख देशांमध्ये कोरोना साथीवरील लसीकरणाला सुरुवात झालेली असेल, असे मानले जाते.

अमेरिकी डॉलर

ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता, सिटीबँकेचा दावा महत्त्वाचा ठरतो. आपल्या दाव्यात सिटीबँकेने ठोस कारणे दिली नसली तरी अमेरिकेसह जगभरात व्यापक प्रमाणात सुरू होणारे लसीकरण हा डॉलरच्या घसरणीला गती देणारा घटक ठरेल, असे म्हटले आहे. हा दावा करताना अमेरिकेची मध्यवर्ती ‘फेडरल रिझर्व्ह’ सध्याच्या पतधोरणात बदल करणार नाही आणि आवश्‍यकतेनुसार अधिकाधिक निधी अर्थव्यवस्थेत टाकण्याची प्रक्रिया कायम ठेवेल, ही शक्यताही गृहित धरली आहे.

गेल्या काही वर्षात अमेरिकी डॉलर अपयशी ठरेल अथवा कोसळेल, असे दावे विविध वित्तसंस्था, अर्थतज्ज्ञ तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आले आहेत. यामागे चीन व रशियासारख्या प्रमुख देशांकडून डॉलर हद्दपार करण्यासाठी चाललेले प्रयत्न हा प्रमुख घटक असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेचे मित्रदेश असणारे युरोपिय देशही डॉलरव्यतिरिक्त इतर चलनांच्या पर्यायाचा विचार करीत असल्याचेही समोर आले आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इतर अधिकाऱ्यांकडून सातत्याने डॉलर हेच जगातील सर्वात भक्कम चलन असल्याची ग्वाही देण्यात आली आहे.

leave a reply