अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळाजवळ अमेरिकेचा ड्रोन हल्ला

- आयएस-खोरासानचे सहा दहशतवादी ठार केल्याचा दावा

काबुल – रविवारी दुपारच्या सुमारास अफगाणिस्तानच्या काबुलमधील विमानतळाजवळ आणखी एक शक्तीशाली स्फोट झाला. यात सहाजण ठार झाले. हा स्फोट म्हणजे अमेरिकेने चढविलेला ड्रोन हल्ला होता, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली. तर या ठिकाणी एक रॉकेट हल्ला झाला आणि दुसऱ्या ठिकाणी अमेरिकेने ड्रोन हल्ला चढविला, अशी माहिती तालिबानने दिली आहे. यामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकच भयंकर बनत चालल्याचे दिसत आहे.

31 ऑगस्टच्या आधी अफागणिस्तानातील आपले सारे नागरिक व सैन्य मागे घेण्याची अंतिम प्रक्रिया पाश्‍चिमात्य देशांनी सुरू केली आहे. ब्रिटनने आपले सारे जवान व नागरिक मागे घेतल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेची माघार देखील अंतिम टप्प्या आहे. अशा परिस्थितीत अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांना अद्दल घडविण्यासाठी काबुल येथील विमानतळावर नवे हल्ले चढविले जाऊ शकतात, अशी चिंता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केली होती.

रविवारी एका वाहनातून ‘आयएस-खोरासान’ या दहशतवादी संघटनेने काही आत्मघाती हल्लेखोर काबुल विमानतळाच्या दिशेने प्रवास करीत होते. या वाहनावर ड्रोनद्वारे हल्ला चढवून अमेरिकेने या आत्मघाती हल्लेखोरांना ठार केले, अशी माहिती अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. तर अफगाणी पोलिसांनी रॉकेट हल्ल्यात सहाजणांचा बळी गेल्याचे सांगून यात एका मुलाचाही समावेश असल्याचे म्हटले आहे. तालिबानने देखील याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेचा ड्रोन हल्ला व अफगाणी पोलीस तसेच तालिबान दावा करीत असलेला रॉकेटचा मारा, हे दोन स्वतंत्र हल्ले असल्याचे समोर येत आहे.

अमेरिकेने आयएस-खोरासानच्या दहशतवाद्यांवर केलेला हल्ला आत्मसंरक्षणासाठी होता, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला. आवश्‍यकता भासल्यास पुढच्या काळातही असे हल्ले चढविले जातील, असे संकेत अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याआधी काबुलच्या विमानतळावर घातपात घडवून 100 हून अधिकजणांचा बळी घेणाऱ्या खोरासानच्या प्लॅनरला अमेरिकेने हवाई हल्ला चढवून ठार केले होते.

दरम्यान, अफगाणिस्तानात माजलेल्या अराजकाच्या पार्श्‍वभूमीवर, दहशतवाद्यांचे हल्ले आणि अमेरिकेने दहशतवाद्यांवर चढविलेले हल्ले अधिकच अस्थैर्य माजवित आहे. दहशतवाद्यांवर हल्ले चढवून अमेरिका आपले सामर्थ्य प्रदर्शित करीत असून सैन्यमाघारीनंतरही अमेरिका दहशतवाद्यांना लक्ष्य करू शकते, असा संदेश देत आहे. पण या हवाई हल्ल्यांसाठी अमेरिकेने नक्की कुठल्या देशाची हवाई हद्द वापरली, असे प्रश्‍न विचारले जात असून पाकिस्तानच्या चिंता या हल्ल्यांमुळे वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply