इराणच्या युरेनियम मेटलच्या निर्णयावर अमेरिका, युरोपिय देशांची जोरदार टीका

तेहरान/वॉशिंग्टन/लंडन – 20 टक्के शुद्धतेचे संवर्धित युरेनियम मेटलची निर्मिती करण्याची घोषणा इराणने केली. शांतीपूर्ण कार्यक्रमासाठी युरेनियम मेटलची निर्मिती करीत असल्याचा दावा इराण करीत आहे. पण इराणचा हा निर्णय 2015 सालच्या अणुकरारातील आणखी एका नियमाचे उल्लंघन ठरतो. यामुळे व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या वाटाघाटींना धक्का बसू शकतो, अशी टीका अमेरिका आणि ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या युरोपिय देशांनी केली. दरम्यान, 20 टक्के शुद्धतेच्या संवर्धित युरेनियम मेटलची निर्मिती इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ नेणारी ठरू शकते, असा दावा केला जातो.

युरेनियम मेटलआंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दोन दिवसांपूर्वी इराणच्या या निर्णयाची माहिती सर्वप्रथम जाहीर केली. त्यानंतर अणुऊर्जा आयोगातील इराणचे राजदूत काझेम घरीबाबादी यांनी याला पुष्टी दिली. तसेच 20 टक्के शुद्धतेच्या संवर्धित युरेनियम मेटलचा वापर वैद्यकीय कारणासाठी करण्यात येईल, असे घरीबाबादी यांनी स्पष्ट केले. ‘यामुळे इराणच्या रेडिओफार्मास्युटीकल्सचा दर्जा वाढेल व आण्विक तंत्रज्ञानात इराण एक प्रगत देश बनेल’, असा दावा घरीबाबादी यांनी केला.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील संवर्धित युरेनियम मेटलच्या निर्मितीचे समर्थन केले. हा निर्णय आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या नियमांना धरुन असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी सांगितले. मात्र इराणबरोबरील अणुकरारावर व्हिएन्ना इथे वाटाघाटी करीत असलेल्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने यावर टीका केली. रशियाने देखील इराणच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. ‘इराणची ही कारवाई अणुकराराला तडा देणारी ठरते. संवर्धित युरेनियम मेटलच्या निर्मितीचा निर्णय घेऊन इराणने अणुकराराबाबतची बांधिलकीशी आपले देणेघेणे नसल्याचे दाखवून दिले आहे.

युरेनियम मेटलअणुकरारासाठी अमेरिकेचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असताना, इराणचा हा निर्णय व्हिएन्ना वाटाघाटीच्या प्रयत्नांना दिलेला धक्का ठरतो’, असा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ठेवला. पण त्याचबरोबर 2015 सालच्या अणुकरारात परतण्यासाठी इराणकडे अजूनही राजकीय वाटाघाटीची खिडकी खुली असल्याचे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले.

‘व्हिएन्ना वाटाघाटीत मिळत असलेले यश इराणच्या या निर्णयामुळे धोक्यात आले आहे. इराणला युरेनियम मेटलवरील संशोधन आणि उत्पादनाची आवश्यकता नाही. या मार्गाने इराण केवळ अणुबॉम्बच्या निर्मितीकडे पावले टाकत आहे. अणुकराराचे उल्लंघन करणार्‍या या सर्व हालचाली इराणने तत्काळ बंद कराव्या आणि व्हिएन्ना येथील चर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे’, असे ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, 2015 साली झालेल्या अणुकरारानुसार इराणने पुढील 15 वर्षापर्यंत म्हणजे 2030 सालापर्यंत युरेनियम मेटलची निर्मिती करणार नसल्याचे मान्य केले होते. पण गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इराणच्या संसदेनेच इस्फाहन प्रकल्पात युरेनियम मेटलची निर्मिती सुरू करण्याचा ठराव संमत केला होता. अशा या 20 टक्के शुद्धतेच्या संवर्धित युरेनियम मेटलची निर्मिती केल्यास इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचेल, असा दावा अमेरिका, युरोपिय देश तसेच आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply