पाकिस्तानने केलेल्या विश्‍वासघातामुळे अमेरिकेला अफगाणिस्तानात अपयश मिळाले

- अमेरिकेचे सिनेटर जॅक रिड यांचा आरोप

जॅक रिडवॉशिंग्टन – ‘विश्‍वासघात करणाऱ्या पाकिस्तानला हाताळण्यात अमेरिकेला आलेले अपयश हे अफगाणिस्तानातील आजच्या भयंकर स्थितीचे प्रमुख कारण आहे. यापासून अमेरिकेने योग्य तो धडा घ्यायलाच हवा’, असा ठपका अमेरिकन सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे अध्यक्ष जॅक रिड यांनी ठेवला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानचे जय साजरे करणाऱ्या पाकिस्तानचा पुढचा मार्ग कठीण असेल, याची जाणीव काही विश्‍लेषकांनी करून दिली होती. सिनेटर जॅक रिड यांनी पाकिस्तानवर केलेला गंभीर आरोप ही बाब नव्याने अधोरेखित करीत आहे.

अफगाणिस्तानच्या मुद्यावर पाकिस्तानने अमेरिकेचा विश्‍वासघात केला. अशा विश्‍वासघातकी पाकिस्तानला हातळण्यात अमेरिकेला आलेले अपयश, अफगाणिस्तानातील आजच्या अस्थैर्याचे प्रमुख कारण ठरते. याबरोबरच दहशतवादविरोधी कारवायांकडे झालेले दुर्लक्ष आणि अफगाणिस्तानात स्थीर सरकार प्रस्थापित करण्यात आलेले अपयश, यामुळे आजची स्थिती उद्भवलेली आहे, असे सिनेटर जॅक रिड यांनी म्हटले आहे. याची जबाबदारी डेमोक्रॅट किंवा रिपब्लिकन पक्षावर टाकता येणार नाही, या अपयशाला सारेजण जबाबदार आहेत, असे रिड यांनी म्हटले आहे. त्याचवेळी या अपयशातून धडा घेऊन पुढच्या काळात आपल्या धोरणात आवश्‍यक ते बदल घडविण्यावाचून पर्याय नाही, असा सल्ला रिड यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानात सुरू झालेल्या संघर्षात, आम्ही कुणाचीही बाजू घेणार नाही, असे पाकिस्तानने जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात पाकिस्तानने तालिबानला शक्य तितके सहकार्य पुरविले. शस्त्रास्त्रे व लष्करी मार्गदर्शनाबरोबरच पाकिस्तानी लष्कराचे जवान तसेच अधिकारी अफगाणिस्तानात घुसून तालिबानच्या बरोबरीने लढत होते. याची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. इतकेच नाही तर अमेरिकेतही याचे पडसाद उमटले असून याआधी पाकिस्तानने गुप्तपणे तालिबानला सहाय्य पुरविले होते, याचेही दाखले दिले जात आहेत. अमेरिकेच्या सैन्यमाघारीची घोषणा झाल्यानंतर सिनेटच्या ‘आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी’चे अध्यक्ष असलेल्या जॅक रिड यांनी पाकिस्तानवर घणाघाती टीका केली होती.

पाकिस्तानच्या विश्‍वासघातामुळेच अमेरिकेला अफगाणिस्तानात अपयश आल्याचा दावा रिड यांनी केला होता. अफगाणिस्तान तालिबानच्या हाती पडल्यानंतर देखील जॅक रिड यांनी अमेरिकेच्या अपयशाची कारणे पुढे करताना, सर्वात आधी पाकिस्तानच्या दुटप्पीपणाचा मुद्दा मांडला. दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेला सहाय्य करीत असल्याचे दाखवून पाकिस्तानने गुप्तपणे तालिबानशी सहकार्य केले होते. तालिबान तसेच इतर दहशतवादी संघटनांची सुरक्षित अभयारण्ये पाकिस्तानच्या सीमेत आहेत. याचा वापर करूनच तालिबानने अफगाणिस्तानात अमेरिकन तसेच अफगाणी सैन्याला टक्कर दिली होती. त्यामुळे अमेरिकेच्या अपयशाचे खरे कारण पाकिस्तानचा विश्‍वासघात असल्याची आठवण करून देऊन जॅक रिड यांनी पाकिस्तानसमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

पुढच्या काळात अफगाणिस्तानातील आपल्या अपयशाचे खापर अमेरिका पाकिस्तानवर फोडणार असल्याची चिंता पाकिस्तानातील पत्रकार व विश्‍लेषक करू लागले आहेत. म्हणूनच पाकिस्तानी नेत्यांनी तालिबानचा विजय साजरा करू नये, असा इशारा हे पत्रकार व विश्‍लेषक देत आहेत. ‘पुढच्या काळात अमेरिका पाकिस्तानवर तालिबान तसेच इतर दहशतवादी संघटनांना सहाय्य केल्याचा आरोप ठेवून कठोर निर्बंध लादल्यावाचून राहणार नाही. त्यासाठी पाकिस्तानने तयार रहावे’, असा इशारा हे विश्‍लेषक तसेच पत्रकार देत आहेत. जॅक रिड यांनी केलेल्या विधानातून याचे संकेत मिळत आहेत. मात्र चीन, रशिया यासारख्या देशांच्या साथीने पाकिस्तान अमेरिकेच्या दबाव तसेच कारवाईचा सामना करू शकतो, असा विश्‍वास पाकिस्तानातील तालिबानसमर्थकांना वाटत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतर जसे सोव्हिएत रशियाचे विघटन झाले, तशीच परिस्थिती अमेरिकेवर देखील ओढावेल, असा तर्क पाकिस्तानातील तालिबानसमर्थक उघडपणे मांडत आहेत.

अमेरिकेने पाकिस्तानला पुरविले जाणारे सहाय्य रोखावे – अमेरिकन संसद सदस्यांची मागणी

अमेरिकन संसदेचे सदस्य माईक वॉल्ट्झ यांनी पाकिस्तानला पुरविले जाणारे सहाय्य त्वरित खंडीत करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. लवकरच अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीची बैठक आयोजित केली जाणार असून यात अफगाणिस्तानातील अपयशाची चौकशी केली जाईल. त्याच्या आधी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य वॉल्ट्झ यांनी केलेली ही मागणी लक्षवेधी ठरते.

पाकिस्तानबरोबरच चीनच्या अफगाणिस्तानातील भूमिकेकडे वॉल्ट्झ यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानच्या साथीने तालिबानचा भारताच्या विरोधात वापर करण्याची चीनची योजना आहे. तसेच तालिबान चीनच्या झिंजियांग प्रांतातील उघूर बंडखोरांना सहाय्य करणार नाही, याकडे चीनचे लक्ष असेल. तसेच अफगाणिस्तानातील एक ट्रिलियन डॉलर्सच्या खनिजसंपत्तीवर चीनचा डोळा आहे. या तीन गोष्टी चीन अफगाणिस्तानात साध्य करील, असा इशारा वॉल्ट्झ यांनी दिला. यासाठी चीन पाकिस्तानचा वापर करू शकतो, हे लक्षात घेऊन अमेरिकेला पाकिस्तानच्या विरोधात पावले उचलावी लागतील, असे संकेत काँग्रेसमन माईक वॉल्ट्झ यांनी दिले आहेत.

leave a reply