तुर्कीतील 2016 सालच्या अपयशी बंडामागे अमेरिकेचा हात

- तुर्की मंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

अंकारा/वॉशिंग्टन- तुर्कीतील एर्दोगन राजवट उलथण्यासाठी 2016 साली झालेल्या बंडामागे अमेरिकेचा हात होता, असा उघड आरोप तुर्कीचे अंतर्गत सुरक्षामंत्री सुलेमान सोयलु यांनी केला. तुर्कीच्या या आरोपाने जबरदस्त खळबळ उडाली असून अमेरिकेने हे आरोप नाकारणारे निवेदन तातडीने प्रसिद्ध केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुर्की अमेरिका व युरोपसह इतर देशांबरोबरील संबंध सुधारण्यासाठी हालचाली करीत असल्याचे समोर आले होते. अशा वेळी तुर्कीच्या वरिष्ठ मंत्र्यांकडून करण्यात आलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते. या घटनेनंतर 24 तासांमध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत तुर्कीच्या ‘एस-400’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मुद्यावर अमेरिकेची कठोर भूमिका कायम असल्याचे म्हटले आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांची राजवट उलथण्यासाठी 2016 साली लष्कराने बंड केले होते. यावेळी झालेल्या संघर्षात किमान 250 जणांचा बळी गेला होता तर हजारो जण जखनी झाले होते. या बंडामागे तुर्कीतील धार्मिक नेते फेतुल्लाह गुलेन व त्यांनी उभारलेल्या संस्थांचा हात असल्याचा आरोप एर्दोगन यांनी केला होता. तुर्की यंत्रणांनी त्यानंतर फेतुल्लाह गुलेन यांचे समर्थक तसेच लष्करी अधिकाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई हाती घेतली होती. या बंडानंतर एर्दोगन यांनी तुर्कीतील राज्यघटनेत महत्त्वाचे बदल करून सत्तेवरील आपली पकड अधिकच घट्ट करण्यात यश मिळविले होते.

गेल्या काही वर्षात एर्दोगन यांनी आपला प्रभाव वाढविण्यासाठी आफ्रिका व आशिया खंडात जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. तुर्कीच्या या आक्रमकतेने अमेरिकेसह युरोपिय तसेच आखाती देश दुखावले गेले आहेत. अमेरिका व युरोपने तुर्कीवर निर्बंध लादले असून त्याचे परिणाम तुर्की अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायल, ग्रीससह युरोपिय देशांशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. त्यासाठी पावले उचलली जात असतानाच तुर्कीच्या मंत्र्यांनी अचानक 2016 साली झालेल्या बंडाचा मुद्दा उपस्थित करून त्यामागे अमेरिका असल्याचा आरोप करणे आश्‍चर्यजनक मानले जाते.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व प्रशासन तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या धोरणांचे विरोधक म्हणून ओळखले जाते. बायडेन यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व नेत्यांनी तुर्कीविरोधात पावले उचलण्याचे संकेतही दिले आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याची गरज असताना तुर्की मंत्र्यांचे वक्तव्य तणावात अधिक भर टाकणारे असल्याचे मानले जाते. तुर्की मंत्र्यांच्या वक्तव्याचे अमेरिकेने ताबडतोब खंडन केले असून ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे बजावले आहे. त्यानंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी, ‘एस-400’ क्षेपणास्त्रयंत्रणेच्या मुद्यावर तुर्कीला लक्ष्य करून दोन देशांमधील तणाव निवळला नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

leave a reply