तैवानमधील शांती आणि स्थैर्यावर अमेरिका-जपानच्या नेत्यांमध्ये चर्चा

- खवळलेल्या चीनची संतप्त प्रतिक्रिया

वॉशिंग्टन/बीजिंग – तैवानच्या आखातात शांतता व स्थैर्य जपान व अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. या मुद्यावर दोन्ही देशांचे एकमत आहे, असे सांगून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतल्यानंतर, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी जाहीर केले. तैवानच्या हवाई क्षेत्रात सुमारे २५ विमानांची घुसखोरी घडवून आणणार्‍या चीनला अमेरिका व जपानने दिलेला हा सज्जड इशारा ठरतो. याची गंभीर दखल चीनने घेतली आहे. अमेरिका व जपानचे हे दुही माजविणारे नकारात्मक प्रयत्न ठरतात, अशी टीका चीनने केली आहे.

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे अमेरिका अत्यंत महत्त्वाच्या दौर्‍यावर दाखल झाले आहेत. अमेरिकेचा दौरा सुरू करण्याआधी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान सुगा यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मुद्यांवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये ‘ईस्ट व साऊथ चायना सी’मधील तणाव, उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम त्याचबरोबर चीनच्या मुद्यावर चर्चा होणार असल्याचे सुगा यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, सुगा यांच्या या अमेरिका दौर्‍याकडे पाहिले जाते.

शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर पंतप्रधान सुगा यांनी माध्यमांशी बोलताना इंडो-पॅसिफक क्षेत्रातील चीनच्या हालचालींवर चर्चा केल्याचे सांगितले. यामध्ये तैवान, हॉंगकॉंग आणि झिंजियांग या मुद्यांचा देखील समावेश होता, असे सुगा म्हणाले. ‘तैवानच्या मुद्यावर माध्यमांसमोर अधिक बोलता येणार नाही, कारण ही बाब राजनैतिक पातळीवरील संवादापुरती मर्यादित आहे. पण तैवानच्या आखातातील शांतता आणि स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे, याबाबत जपान व अमेरिकेमध्ये आधीच एकवाक्यता झाली आहे. या चर्चेच्या निमित्ताने याची पुष्टी झाली’, असे सुगा यांनी स्पष्ट केले.

याशिवाय हॉंगकॉंगमधील लोकशाहीची मागणी करणार्‍या निदर्शकांवर झालेली कारवाई आणि झिंजियांगमधील उघूरवंशियांवर होणार्‍या अत्याचारावरही अमेरिका व जपानच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान सुगा यांच्यातील बैठकीत तैवान, हॉंगकॉंग आणि झिंजियांगचा उल्लेख होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे चीनच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी शुक्रवारीच धमकावले होते. पण यानंतरही अमेरिका आणि जपानच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली व पंतप्रधान सुगा यांनी जाहीरपणे त्याचा उल्लेख केल्यामुळे चीन चांगलाच खवळला आहे. ‘मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या नावाखाली दुही माजविणारे आणि गटबाजी करणारे नकारात्मक प्रयत्न करणे, यासारखी विसंगतीपूर्ण बाब नाही’, अशी टीका अमेरिकेतील चीनच्या दूतावासाने केली.

leave a reply