अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढविल

- अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघार घेत असतानाच, अफगाणी लष्कर आणि तालिबानमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे. या संघर्षात तालिबानचे शेकडो दहशतवादी हवाई हल्ल्यात मारले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी तालिबानने मुसंडी मारून राजधानी काबुलच्या दिशेने आगेकूच सुरू केल्याचे दिसू लागले आहे. मात्र तालिबानने काबुल किंवा अन्य महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याच्या आधी, अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढवू शकेल. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अफगाणविषयक योजनेत आवश्यक ते फेरबदल केले जातील, असा दावा एका अमेरिकी वर्तमानपत्राने केला आहे.

अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढविल - अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावाअफगाण लष्कर आणि तालिबानमधील संघर्ष वाढत चालला आहे. गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 111 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तर तालिबानने बघलान प्रांतातील अफगाणी लष्कराच्या तळाजवळ घडविलेल्या कारबॉम्बस्फोटात सहा जवान मारले गेले. तर किमान 60 जवानांनी तालिबानसमोर शरणांगती पत्करून दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या हल्ल्यांमुळे अफगाणी जवानांनी पळ काढला होता. राजधानी काबुलमधील तालिबानचे हल्ले वाढले आहेत.

गेल्या आठवड्यात काबुलमध्ये तीन बसबॉम्बस्फोट झाले होते. याशिवाय मुलींच्या शाळेच्या आवारातही दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडविले होते. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानातून वेगाने सुरू केलेली सैन्यमाघार तालिबानच्या या वाढत्या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा वेग असाच कायम राहिला तर येत्या वर्षअखेरीपर्यंत तालिबानचे दहशतवादी राजधानी काबुलसह महत्त्वाची शहरे, लष्करी तळ आणि परदेशी दूतावासांचा ताबा घेतील, असा दावा केला जातो. असे झाले तर दोन दशकानंतर पुन्हा अफगाणिस्तानचे तालिबानीकरण होईल, अशी चिंता व्यक्त केली जाते.

अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढविल - अमेरिकेच्या वर्तमानपत्राचा दावापण अशी परिस्थिती निर्माण झाली तर अमेरिका तालिबानवर हवाई हल्ले चढविल, अशी माहिती अमेरिकी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वर्तमानपत्राशी बोलताना दिली. अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीनंतरच्या या हवाई हल्ल्यांवर पेंटॅगॉन गांभीर्याने विचार करीत आहे. तसेच यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची अधिकृत परवानगी घेणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले. तालिबानवरील या हवाई हल्ल्यांसाठी पर्शियन आखातातील लष्करी तळांचा वापर केला जाईल. पण दीर्घकाळासाठी अशी हवाई मोहीम राबविणे कठीण होईल. कारण पुढच्या महिन्यापर्यंत अमेरिका अफगाणिस्तानातील सर्व हवाईतळांचा ताबा सोडणार असल्याची माहिती या अधिकार्‍यांनी दिली.

त्यामुळे अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी शेजारी देशांमध्ये लष्करी तळ मिळविण्यासाठी अमेरिकेच्या ‘सीआयए’चे प्रयत्न सुरू आहेत. सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी नुकताच पाकिस्तानचा दौरा करून याविषयी चर्चा केली होती. या भेटीत बर्न्स यांना हवे होते ते मिळाल्याचा दावा करून काही पाकिस्तानी पत्रकारांनी आपल्या सरकारने अमेरिकेला तळ देण्याचे मान्य केल्याचा संशय व्यक्त केला. पण पाकिस्तानचे सरकार मात्र ही बाब नाकारत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या लष्करी तळावरून पाकिस्तानात परस्परविरोधी दाव्यांचे सत्र सुरू असल्याचे दिसते. मात्र अमेरिकेची मागणी पाकिस्तानच्या सरकारने मान्य केली नाही, तर येत्या काही दिवसात अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए पाकिस्तानात काहीतरी मोठे घडविल, अशी चिंता या देशातील काही विश्‍लेषक व्यक्त करीत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या आधीच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती देऊन या विश्‍लेषकांनी येत्या काही दिवसात पाकिस्तानात अघटीत घडेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

leave a reply