अमेरिकेचे लष्कर चीन व रशियाविरोधातील युद्धासाठी सज्ज नाही

- ‘फॉरेन पॉलिसी’ या वेबसाईटचा दावा

अमेरिकेचे लष्करवॉशिंग्टन – अमेरिकेचे लष्कर चीन व रशियाविरोधातील युद्धासाठी पूर्णपणे सज्ज नसल्याचा दावा ‘फॉरेन पॉलिसी’ या वेबसाईटने केला आहे. अमेरिकेच्या लष्करानेच केलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीही लष्कर सज्ज नसल्याच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. मात्र संरक्षण विभागाने दावे फेटाळले असून वरिष्ठ अधिकार्‍यांना युद्धसज्जता तसेच विजयाचा ठाम विश्‍वास असल्याचा खुलासा केला.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानमधून माघार घेतली होती. अमेरिकेच्या या माघारीदरम्यान उडालेल्या गोंधळावरून वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांवर प्रचंड टीका झाली होती. ही माघार धोरणात्मक चूक असल्याचे तसेच अमेरिका आता महासत्ता राहिली नसल्याचे दावे या माघारीनंतर करण्यात आले होते. हे दावे समोर येत असतानाच अमेरिकेच्या संरक्षणखर्चात लष्करावरील खर्चात कपात होऊ शकते, अशी माहितीही समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘फॉरेन पॉलिसी’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेले वृत्त लक्ष वेधून घेणारे ठरते.

अमेरिकेच्या लष्कराने गेल्या वर्षी सुमारे साडेपाच हजार जवानांसह नागरिकांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात युद्धसज्जतेबाबत प्रश्‍न विचारण्यात आले होते. त्यावर प्रतिसाद देताना सुमारे ३४ टक्के जवानांनीच युद्धसज्जतेबाबत विश्‍वास दर्शविला होता. वरिष्ठ अधिकार्‍यांपैकीही २० ते ४० टक्के अधिकार्‍यांनीच तात्काळ तैनाती व जिंकण्याची खात्री व्यक्त केली होती. अमेरिकेचे लष्कर सज्ज नसल्याच्या शक्यतेला माजी अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल थॉमस स्पोहर यांनी, जर आज युद्ध झाले तर लष्कराची स्थिती खरच कठीण असेल, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. लष्कराच्या काही ब्रिगेड्स सुसज्ज आहेत, पण ही संख्या पुरेशी नाही याकडे निवृत्त लेफ्टनंट जनरल थॉमस स्पोहर यांनी लक्ष वेधले. मात्र संरक्षण विभागाने लष्कर सज्ज नसल्याचे दावे फेटाळले. लष्कराचे वरिष्ठ अधिकारी सज्जता तसेच जिंकण्याबाबत ठाम आहेत, असा खुलासा संरक्षण विभागाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल टेरेन्स केली यांनी केला.

हेरिटेज फाऊंडेशन या अभ्यासगटाने प्रसिद्ध केलेल्या माहितीत, लष्कराच्या केवळ ५८ टक्के इतक्या ‘ब्रिगेड कॉम्बॅट टीम्स’ युद्धासाठी पूर्ण सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे. लष्कराने निर्धारित केलेल्या लक्ष्यापेक्षा ही टक्केवारी कमी असल्याचे या अभ्यासगटाने लक्षात आणून दिले. केवळ लष्करच नाही तर अमेरिकेचे हवाईदल व नौदलातील समस्याही समोर येत असल्याचे ‘फॉरेन पॉलिसी’ या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

leave a reply