अमेरिकेकडून युक्रेनला 15 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा – काऊंटर-ड्रोन सिस्टिम्सचा समावेश

वॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – अमेरिकेच्या संरक्षण विभागाने युक्रेनला 15 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची घोषणा केली आहे. त्यात ‘काऊंटर ड्रोन सिस्टिम्स’सह ‘काऊंटर आर्टिलरी रडार’, ‘सिक्युअर कम्युनिकेशन गिअर’ व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’चा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात अमेरिकेने युक्रेनला संरक्षणसहाय्य जाहीर करण्याची ही दुसरी वेळ आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेणार असून, या पार्श्‍वभूमीवर युक्रेनला संरक्षणसहाय्य जाहीर होणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

संरक्षणसहाय्याची घोषणाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर रशिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर क्रिमिआच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेऊन अमेरिका रशियाच्या ताब्याला कधीही मान्यता देणार नसल्याचा इशाराही दिला होता. गेल्याच महिन्यात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, रशियाच्या आक्रमक हालचालींविरोधात अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभा व युक्रेनला मोठ्या प्रमाणावर संरक्षणसहाय्य पुरविण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. शुक्रवारी संरक्षण विभागाने केलेली घोषणा त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने 2021 सालच्या बजेटमध्ये युक्रेनसाठी 27.5 कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याची तरतूद केली होती. त्यातील 12.5 कोटी डॉलर्सचे संरक्षणसहाय्य मार्चमध्ये घोषित करण्यात आले होते. त्यात सशस्त्र गस्तीनौका व रडार्सचा समावेश होता. शुक्रवारी जाहीर झालेले सहाय्य बजेटमध्ये केलेल्या तरतुदीतील उर्वरित भाग असल्याचे दिसत आहे. 15 कोटी डॉलर्सच्या नव्या घोषणेत, ‘काऊंटर ड्रोन सिस्टिम्स’सह ‘काऊंटर आर्टिलरी रडार’, ‘सिक्युअर कम्युनिकेशन गिअर’ व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’चा समावेश आहे.

संरक्षणसहाय्याची घोषणायासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, युक्रेन संरक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी योग्य पावले टाकत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ‘पेंटॅगॉन’ने युक्रेनच्या घोषणेसाठी निवडलेली वेळ लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेणार आहेत. अमेरिका-रशिया संबंधांसाठी ही भेट महत्त्वाची मानली जाते. बायडेन यांनी या भेटीत रशियाला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे उपस्थित करणार असल्याचे संकेत दिले आहेत. युक्रेनच्या संरक्षणसहाय्याची घोषणा करून बायडेन प्रशासनाने आपण रशियाला उघड आव्हान देण्यास तयार असल्याचे संकेत दिल्याचे मानले जाते.

दरम्यान, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांबरोबर होणार्‍या भेटीपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एका मुलाखतीदरम्यान, रशिया व अमेरिकेतील संबंध सध्या रसातळाला पोहोचले असल्याचे वक्तव्य केले आहे. ‘एनबीसी न्यूज’ने घेतलेल्या मुलाखतीत पुतिन यांना बायडेन यांनी उल्लेख केलेल्या ‘मारेकरी’ शब्दाबद्दलही प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर बोलताना, आपण अशा गोष्टींची फारशी चिंता करीत नाही, असे उत्तर पुतिन यांनी दिल्याचे समोर आले आहे.

leave a reply