उत्तर कोरियाच्या धमक्यांनंतरही अमेरिकेची चर्चेची तयारी

चर्चेची तयारीसेऊल/प्योनग्यँग – उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांच्याकडून सातत्याने धमक्यांचे सत्र सुरू असतानाही अमेरिका व दक्षिण कोरियाने आपण चर्चेला तयार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे विशेषदूत सुंग किम सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्याकडून उत्तर कोरियाबरोबर चर्चेची तयारी दर्शविण्यात आली. अमेरिका व दक्षिण कोरियात गेल्या आठवड्यापासून संयुक्त सरावही सुरू झाला असून या सरावाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष दूतांची भेट महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, अमेरिकेचे विशेष दूत रशियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांच्यादरम्यान झालेली बैठक अपयशी ठरली होती. त्यानंतर दोन देशांमधील चर्चा पूर्णपणे थांबली आहे. अमेरिकेकडून अनेकदा चर्चेची तयारी दर्शविण्यात आली असली तरी उत्तर कोरियाने त्यासाठी घातलेल्या अटी मान्य करण्याचे नाकारले आहे. निर्बंध शिथिल करणे व दक्षिण कोरियातील सैन्य मागे घेणे यासारख्या अटी उत्तर कोरियाने घातल्या होत्या. अमेरिकेने अटी नाकारल्याने उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या आण्विक सामर्थ्यात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने दक्षिण कोरिया व जपानबरोबरील संरक्षण सहकार्य अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली असून, दक्षिण कोरियाबरोबरील संयुक्त सराव त्याचाच भाग मानला जातो. या सरावाच्या मुद्यावरून उत्तर कोरियाने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्याभरात उत्तर कोरियाने तीनदा धमकावले होते. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी, अमेरिका व दक्षिण कोरियाच्या संयुक्त सरावामुळे या क्षेत्रात सुरक्षेची समस्या निर्माण होणार असून त्याविरोधात अनपेक्षित प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला होता.

त्यानंतर उत्तर कोरियाकडून दोनदा ‘नॅव्हिगेशनल वॉर्निंग’ही जारी करण्यात आली होती. ही वॉर्निंग आण्विक चाचणीची पूर्वसूचना असावी, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर कोरियाने लष्करी प्रशिक्षणला सुरुवात केल्याची माहितीही समोर आली आहे. सराव करणाऱ्या अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या हालचालींवर लक्ष असल्याचेही सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या विशेषदूतांनी दक्षिण कोरियात दाखल होणे व उत्तर कोरियाला चर्चेचे आवाहन करणे महत्त्वाचे ठरते.

गेल्या वर्षी जून महिन्यात उत्तर कोरियाने दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी स्थापन केलेले राजनैतिक कार्यालय बॉम्बस्फोटात उडवून दिले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने दोन देशांमधील संपर्क तोडून लष्करी व आण्विक हालचालींना वेग दिला होता. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जाँग उन यांनी चीनबरोबरील सहकार्य अधिक वाढविण्याचे प्रयत्नही सुरू केले होते.

दक्षिण व उत्तर कोरियातील संपर्कासाठी उभारण्यात आलेल्या ‘हॉटलाईन’ला प्रतिसाद देण्याचे उत्तर कोरियाने बंद केल्याची माहिती दक्षिण कोरियाने दिली आहे. या हालचाली दक्षिण कोरिया व अमेरिकेवर दडपण आणण्यासाठी असल्याचे दिसत आहे.

leave a reply