अमेरिका व रशियाने अणुयुद्ध टाळायला हवे

- रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह

अणुयुद्धमॉस्को – रशिया व अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अण्वस्त्रांवर अधिक बंधने लादण्यासाठी प्रयत्न करून अणुयुद्ध टाळण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी केले आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्याच महिन्यात रशियाबरोबरील ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ला मुदतवाढ देण्यास मान्यता दिली होती. सध्या जगभरात सुमारे १५ हजार अण्वस्त्रे असून त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अण्वस्त्रे अमेरिका व रशियाकडे असल्याचे सांगण्यात येते.

‘संपूर्ण जगाने परस्परांवर विश्‍वास ठेऊन पुढे पावले उचलायला हवीत. सर्वांनी एकत्र येऊन अण्वस्त्रांच्या मुद्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. अणुयुद्ध कधीही जिंकता येणे शक्य नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये, असा प्रस्ताव रशियाने इतर अण्वस्त्रधारी देशांसमोर मांडला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्याशी १९८५ साली झालेल्या भेटीत मी हाच मुद्दा मांडला होता. त्यामुळेच पुढे अण्वस्त्रांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली’, असे माजी रशियन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी सांगितले.अणुयुद्ध

आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी परस्परांची भेट घेऊन अण्वस्त्रांच्या मुद्यावर चर्चा करायला हवी, असा सल्ला गोर्बाचेव्ह यांनी दिला. ‘एकत्र भेटणे व चर्चा करणे गरजेचे असते, हे अनुभवातून सिद्ध झाले आहे. काहीही करून अणुयुद्ध रोखणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही समस्या टाळायची असेल, तर ते एकट्याने सोडविणे शक्य नाही त्यामुळे भेट आवश्यक आहे’, असे आवाहन रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केले. अण्वस्त्रांची संख्या कमी करण्याची व सुरक्षा मजबूत करण्याची इच्छा असेल, तर अनेक गोष्टी शक्य होऊ शकतात, असेही गोर्बाचेव्ह म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी अण्वस्त्रांच्या मुद्यावर वाढती चिंता व्यक्त करताना विनाशाचा इशारा दिला होता. ‘जोपर्यंत जगातील विविध देशांकडे सर्वसंहाराची क्षमता असणारी अण्वस्त्रे आहेत, तोपर्यंत जगाला असलेला प्रचंड विनाशाचा धोका कायम असेल’, असे गोर्बाचेव्ह यांनी एका मुलाखतीत बजावले होते.

leave a reply