अमेरिका व रशियामध्ये अंतराळ सुरक्षा आणि अण्वस्त्रांबाबत चर्चा सुरू

व्हिएन्ना – चीनकडून विविध क्षेत्रात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने अंतराळ सुरक्षा तसेच अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर रशियाशी चर्चा सुरू केली आहे. युरोपच्या व्हिएन्ना शहरात सुरू झालेली ही चर्चा चार दिवस सुरू राहणार असून दोन्ही देशांच्या परराष्ट्र, संरक्षण तसेच आण्विक सुरक्षेशी निगडित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने रशियावर उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. तर रशियाने, अमेरिका अण्वस्त्रांशी निगडित नव्या करारासाठी उत्सुक नसल्याचे दावे केले होते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू होणे महत्त्वाचे ठरते.

अमेरिका व रशियामध्ये अंतराळ सुरक्षा आणि अण्वस्त्रांबाबत चर्चा सुरूगेल्यावर्षी, अमेरिकेने रशियाबरोबरच्या ‘आयएनएफ’ (इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी) करारातून माघार घेतली होती. रशियाकडून करारातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या होत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. रशियाने अमेरिकेचे आरोप धुडकावून लावत उलट आपण ‘स्टार्ट ट्रिटी’च्या पुढील टप्प्यासाठीही तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेने चीनकडील अण्वस्त्रांचा मुद्दा उपस्थित करीत नव्या स्टार्ट करारात चीनचाही समावेश करण्याचा आग्रह धरला होता. मात्र चीनने त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अमेरिका व रशियामध्ये २०१० साली झालेल्या ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’ नुसार, दोन्ही देशातील तैनात अण्वस्त्रांची संख्या १,५५०पेक्षा अधिक राहणार नाही, असे ठरले आहे.

शस्त्रस्पर्धेबरोबरच अमेरिका व रशियामधील वाढती अंतराळ स्पर्धा वादाचा मुद्दा ठरला आहे. रशिया व चीन हे दोन्ही आघाडीचे देश अंतराळातील युद्धासाठी घातक शस्त्रास्त्रे विकसित करीत असल्याचा आरोप अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिका व ब्रिटनने रशियावर उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतल्याचा आरोप केला होता. १५ जुलै रोजी रशियाने घेतलेली ही चाचणी जगापासून लपवून ठेवल्याचा ठपका या दोन्ही देशांनी ठेवला होता. रशियाच्या या चाचणीमुळे अंतरळातील अमेरिका, ब्रिटन तसेच मित्रदेशांच्या हितसंबंधाना धोका निर्माण झाल्याची टीका या देशांनी केली होती. रशियाची ही कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचा दावाही अमेरिकेने केला होता.

रशियावर करण्यात आलेल्या या गंभीर आरोपानंतर अमेरिका व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान फोनवरून चर्चाही पार पडली होती. यावेळी सामरिक स्थैर्य, शस्त्रास्त्रबंदी, इराण, कोरोनाव्हायरस व इतर महत्त्वांच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडल्याची माहिती दोन्ही देशांनी प्रसिद्ध केली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेली ही दुसरी चर्चा ठरली होती. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता, अमेरिका व रशियात सोमवारपासून व्हिएन्नामध्ये सुरू झालेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरले आहे.चर्चेतील पहिला दिवस पूर्णपणे अंतराळ सुरक्षेच्या मुद्यासाठी राखून ठेवण्यात आला असून, त्यानंतर तीन दिवस अण्वस्त्रांसंबंधातील ‘न्यू स्टार्ट ट्रिटी’च्या पुढील टप्प्यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. ही चर्चा अमेरिका-रशिया दोघांच्याही हितसंबंधांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे संकेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिले आहेत.

अमेरिका व रशियामध्ये अंतराळ सुरक्षा आणि अण्वस्त्रांबाबत चर्चा सुरूदरम्यान, अमेरिकेने चीनची कोंडी करण्यासाठी रशिया व चीनमधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण करावा, अशा स्वरूपाचे संकेत अमेरिकेतील काही आजी-माजी अधिकाऱ्यांकडून दिले जात आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात फारशी जवळीक राहिली नसल्याचे दावेही अमेरिकन अधिकाऱ्यांनी केले आहेत. २०१४ साली अमेरिकेसह युरोपीय देशांनी टाकलेल्या निर्बंधांनंतर रशियाने चीनशी अधिक जवळीक साधण्यात सुरुवात केली होती.

इंधन व संरक्षण क्षेत्रातील मोठे करार आणि अर्थ, गुंतवणूक तसेच अंतराळ क्षेत्रातील सहकार्य या आधारावर ही जवळीक निर्माण झाली आहे. मात्र हेरगिरीच्या घटना, तंत्रज्ञानाची नक्कल व इतर अनेक मुद्द्यांवरून दोन देशांमधील मतभेद सातत्याने समोर येत आहेत. अमेरिकेला विरोध हे दोन देशांच्या धोरणांमधील प्रमुख साम्य असून, रशिया व अमेरिकेमधील तणाव कमी करण्यासाठी पावले उचलल्यास चीनला तो मोठा धक्का ठरेल, असा दावा अमेरिकी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

leave a reply