अमेरिका, सौदीच्या लष्कराचा ड्रोनभेदी सराव

रियाध – अमेरिकी मरिन्स आणि सौदी अरेबियाच्या लष्करामध्ये ड्रोनभेदी सराव पार पडला. टेहळणी तसेच हल्लेखोर ड्रोन्स भेदणे किंवा निकामी करण्याचा सराव दोन्ही देशांच्या जवानांनी केला, अशी माहिती अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने दिली. अमेरिका आणि सौदीच्या लष्करी तसेच महत्त्वाच्या ठिकाणांवरील ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढू लागली आहे. सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी काही दिवसांपूर्वी यावर चिंता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर, सदर सरावाचे महत्त्व वाढले आहे.

अमेरिका, सौदीच्या लष्कराचा ड्रोनभेदी सरावआखाती आणि मध्य आशियाई देशांतील अमेरिकेच्या हितसंबंधाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने या सरावाची माहिती जाहीर केली. ‘मरिन एअर-ग्राऊंड टास्क फोर्स’ आणि ‘मरिन एअर डिफेन्स इंटिग्रेटेड सिस्टीम’च्या सहाय्याने हा सराव पार पडला. कमी उंचीवरुन उडणारी टेहळणी किंवा हल्लेखोर ड्रोन्स निकामी करणे किंवा त्यांना लक्ष्य करण्यासाठी या यंत्रणांचा वापर केला जातो. लष्करी वाहनावर बसवलेल्या या यंत्रणांमुळे लघू पल्ल्यावरील ड्रोन्सना भेदणे देखील सोपे होत असल्याची माहिती सेंटकॉमने दिली.

अमेरिका, सौदीच्या लष्कराचा ड्रोनभेदी सरावयेमेनमधील हौथी बंडखोरांनी देखील सौदी अरेबियाच्या इंधन प्रकल्प आणि लष्करी तळांवर ड्रोन्सचे हल्ले वाढविले आहेत. काही तासांपूर्वीच हौथी बंडखोरांनी सौदीच्या प्रवासी विमानतळ तसेच शाळेच्या इमारतीवर ड्रोन्सचे हल्ले चढविले होते. अमेरिका तसेच इजिप्तने सौदीवरील या ड्रोन हल्ल्यांवर टीका केली होती. आपल्या सुरक्षेसाठी पावले उचलण्याचा सौदीला पूर्ण अधिकार असल्याचे इजिप्तने म्हटले होते.

अमेरिका, सौदीच्या लष्कराचा ड्रोनभेदी सरावअल कायदा आणि आयएससारख्या दहशतवादी संघटना व्यावसायिक ड्रोन्सचा वापर हल्ले चढविण्यासाठी करतात. स्वस्त व वजनाला हलके असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या ड्रोन्सचा वापर वाढला आहे. ग्रिनेड, मॉर्टर किंवा ऍसिडचा वापर करून हल्ले चढविले जातात. इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढविण्यासाठी या ड्रोन्सचा वापर केला होता.

सेंटकॉमचे प्रमुख जनरल मॅकेन्झी यांनी काही दिवसांपूर्वी इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर होणार्‍या या ड्रोन हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली होती. अमेरिकी लष्कराला इराकमधून पिटाळून लावण्यासाठी इराणसंलग्न दहशतवादी संघटना हे ड्रोन हल्ले चढवित असल्याचे जनरल मॅकेन्झी म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसात अमेरिका आणि सौदीच्या लष्करात पार पडलेला हा ड्रोनभेदी सराव महत्त्वाचा ठरतो.

leave a reply