अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्या भारतभेटीने चीनची अस्वस्थता वाढली

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी नवी दिल्लीत बौद्धधर्मगुरू व तिबेटी नेते दलाई लामा यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. अपेक्षानुसार यावर चीनची प्रतिक्रिया आली. ही भेट घेऊन अमेरिकेने तिबेटी फुटिरांना चुकीचा संदेश दिल्याचा ठपका चीनने ठेवला. तसेच तिबेट हा चीनचा भाग असल्याचे मान्य करणार्‍या अमेरिकेने सदर भेट घेऊन चीनबरोबरील करारांचा भंग केला आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. याबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील समान हितसंबंध आणि लोकशाहीचा पुरस्कार करण्यावर भारत व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे झालेले एकमत चीनला चांगलेच खुपल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांच्या भारतभेटीने चीनची अस्वस्थता वाढलीअफगाणिस्तानातील घडामोडी व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य हे अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांच्या भारतभेटीतील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे होते. तसेच परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी नवी दिल्लीत दलाई लामा यांचे प्रतिनिधी गोडूप डाँगचूंग यांची भेट घेऊन चर्चा केली होती. तसेच ब्लिंकन यांनी नागरी अधिकारांच्या क्षेत्रात कार्य करणार्‍यांबरोबर केलेल्या चर्चेतही तिबेटींच्या प्रतिनिधींचा समावेश होता. याच्या आधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी दलाई लामा यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. भारताच्या पंतप्रधानांनीही दलाई लामा यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. यावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली.

भारत व अमेरिका मिळून ‘तिबेट कार्डाचा’ वापर करणार आहेत व याद्वारे हे दोन्ही देश चीनवरील दडपण वाढविणार आहे, अशी चिंता चीनची सरकारी माध्यमे व विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी तिबेटींच्या प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेवर चीनने आक्षेप?घेतला. ही चर्चा करून अमेरिकेने चीनबरोबरील करारांचा भंग केला आहे, असा ठपका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी ठेवला. अमेरिका व दलाई लामा यांच्यातील कुठल्याही प्रकारचा अधिकृत संपर्क म्हणजे अमेरिका व चीनमधील कराराचा भंगच ठरतो कारण तिबेट हा चीनचाच भाग आहे. अमेरिकेने देखील ते मान्य केलेले आहे, असे लिजिआन यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

तिबेटला चीनपासून स्वतंत्र करण्याचे प्रयत्न करणार्‍यांना अमेरिकेने बळ देऊ नये. याविरोधात चीन आवश्यक ती कारवाई केल्यावाचून राहणार नाही, असा इशारा लिजिआन यांनी दिला. मात्र आपल्या या इशार्‍यात चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा उल्लेख करण्याचे टाळले. भारत व अमेरिका हे दोन महान लोकशाहीवादी देश असल्याचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन आपल्या भारतभेटीत म्हणाले होते. तसेच लोकशाहीचा पुरस्कार करणार्‍या या दोन्ही देशांचे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील हितसंबंध एकसमान आहेत, असा दावाही ब्लिंकन यांनी केला होता. त्यावरही चीनची प्रतिक्रिया आली आहे. लोकशाहीचे सर्वाधिकार कुणा एका देशाकडे असू शकत नाही, असे झाओ लिजिआन यांनी बजावले आहे.

leave a reply