अफगाणिस्तानात घुसून तालिबानवर हल्ला चढविण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात लष्करी तळ उभारला

काबुल – अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या आधी, अमेरिका अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये लष्करी तळाची व्यवस्था करील, अशी घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली होती. यानंतर अफगाणिस्तानातून मागे घेतलेले सैन्य अमेरिका पाकिस्तानात तैनात करणार असल्याचे दावे सुरू झाले. त्यावर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकन सैन्याला पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवू दिला जाणार नाही, अशी बाणेदार भूमिका घेतली होती. पण आता अफगाणिस्तानलगच्या सीमेवरील पाकिस्तानच्या भागात अमेरिकेने लष्करी तळ उभारल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे फार मोठे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा इशारा या देशाचे पत्रकार देत आहेत.

लष्करी तळअफगाणिस्तान व पाकिस्तानच्या ड्युरांड लाईन सीमेवरील पाकतिया-खुर्रम भागात अमेरिकेचा तळ उभा करण्यात येत आहे. दररोज या ठिकाणी आठ ते दहा हेलिकॉप्टर्स उड्डाण करतात, अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते. तसेच इथल्या शालोझन व टर्मिनल या भागांमध्ये नव्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्या सदर तळाच्या सुरक्षेसाठीच असाव्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातून अमेरिका आपले सैन्य माघारी घेणार असली तरी या देशावरचे नियंत्रण सोडून देणार नाही, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे. पाकिस्तानातील या तळाचा वापर अमेरिका अफगाणिस्तानच्या लष्कराला सहाय्य करण्यासाठी व तालिबानवर हल्ले चढविण्यासाठी करील, असे संकेत दिले जातात.

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे अधिकारी याची माहिती द्यायला तयार नाहीत. पण सध्या अफगाणी लष्कर व तालिबान यांच्यात सुरू असलेल्या घनघोर संघर्षात अमेरिकेचे हवाई दल तालिबानवर हल्ले चढवित असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. यामुळे शेकडोंच्या संख्येने तालिबानी दहशतवादी ठार होत आहेत. अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यांसाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्याची परवानगी अमेरिकेला दिल्याचेही समोर आले होते. त्यामुळे तालिबानवर अमेरिकेकडून केले जात असलेले हल्ले पाकिस्तानच्या सहमतीनेच होत असल्याचे दिसते.

गेल्या काही आठवड्यांपासून तालिबानकडून पाकिस्तानला फार मोठा धोका संभवतो, असे दावे करणार्‍या बातम्या माध्यमांमध्ये सोडल्या जात आहेत. त्यामागे पाकिस्तानची रणनीति होती, हे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानने आपल्याला लष्करी तळ उपलब्ध करून द्यावे, यासाठी अमेरिकेने प्रचंड प्रमाणात दडपण टाकले होते. फायनॅन्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफच्या कारवाईची धमकी व अर्थसहाय्य रोखून पाकिस्तानला दिवाळखोर बनविण्याच्या इशार्‍याचाही यात समावेश होता. म्हणूनच पाकिस्तानला अमेरिकेची ही मागणी मान्य करावी लागली. पण अधिकृत पातळीवर अजूनही याबाबत दोन्ही देशांमध्ये करार झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी हे सहकार्य अनौपचारिक पातळीवरच असल्याचे दिसते.

पाकिस्तान याबाबतची माहिती दडवून आपली अब्रू वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे खरा. पण अफगाणिस्तान, इराण व रशियन माध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. अमेरिकेच्या पाकिस्तानातील तळाचे पुरावे आपल्याकडे आहेत असे सांगून पाकिस्तानी लष्कर अमेरिकेच्या साथीने हे तळ तयार करीत असल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. त्यामुळे पुढच्या काळात चीन, रशिया, इराण यांची नाराजी पाकिस्तानला भोवणार असल्याचे दिसते. त्याचवेळी आपल्यावर हल्ले चढविणार्‍या अमेरिकेला तळ पुरविणार्‍या पाकिस्तानवर तालिबानकडून भीषण दहशतवादी हल्ले सुरू होतील, अशी चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करू लागले आहेत.

leave a reply