लिबियात हस्तक्षेप करणार्‍या तुर्कीवर अमेरिकेने कारवाई करावी

लिबियाच्या वरिष्ठ नेत्याची अमेरिकेकडे मागणी

कैरो – लिबियात संघर्षबंदी लागू करुन दोन्ही गटांमध्ये वाटाघाटी सुरू करण्यासाठी लवकरच प्रयत्न केले जातील. पण त्याआधी आपल्या देशात लष्करी हस्तक्षेप करणार्‍या तुर्कीला रोखण्यासाठी अमेरिकेने कारवाई करावी, अशी मागणी लिबियन संसदेचे सभापती अग्युला सालेह यांनी केली. काही तासांपूर्वी अमेरिकेने लिबियात शस्त्रतस्करी करणार्‍या तुर्की संलग्न कंपन्यांवर निर्बंधांची कारवाई केली. त्यानंतर लिबियन संसदेच्या सभापतींनी ही मागणी केली आहे. दरम्यान, अमेरिकेपाठोपाठ जर्मनी, फ्रान्स आणि इटली या देशांनी देखील तुर्कीवर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे.

लिबियात हस्तक्षेप करणार्या तुर्कीवर अमेरिकेने कारवाई करावीलिबियन संसदेचे सभापती सालेह हे सध्या इजिप्तच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी अमेरिकेचे लिबियातील राजदूत रिचर्ड नोर्लंड यांची भेट घेऊन आपल्या देशातील गृहयुद्ध थांबविण्याचे आवाहन केले. लिबियातील संघर्ष थांबविण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या बर्लिन इंटरनॅशनल बैठक आणि कैरो चर्चेतील मुद्द्यांचे पालन करण्यासाठी तयार असल्याचे सालेह यांनी नोर्लंड यांच्याबरोबरच्या चर्चेत सांगितले. त्याचबरोबर लिबियातील सराज यांचे सरकार आणि हफ्तार बंडखोरांमध्ये वाटाघाटी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न केले जातील, असा विश्वास सालेह यांनी व्यक्त केला. पण त्याआधी लिबियात लष्करी हस्तक्षेप करुन संघर्ष भडकाविणार्‍या तुर्कीवर अमेरिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सालेह यांनी केली.

अमेरिकी राजदूत नोर्लंड यांनी देखील बर्लिन आणि कैरो येथील चर्चेत ठरल्याप्रमाणे लिबियात संघर्षबंदी लागू करण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जातील, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, संघर्ष हा लिबियातील समस्येवर तोडगा नसल्याचे नोर्लंड यांनी स्पष्ट केले. यानंतर सालेह यांनी इजिप्तच्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. काही तासांपूर्वी अमेरिकेने लिबियातील गटांना शस्त्रतस्करी करणार्‍या परदेशी कंपन्या तसेच व्यक्तींवर निर्बंध लादले होते. यामध्ये लिबियातील सराज सरकारला शस्त्रसज्ज करणार्‍या तुर्की व माल्टा या देशातील कंपन्यांचा सहभाग होता. अमेरिकेचे हे निर्बंध तुर्कीसाठी इशारा असल्याचे मानले जातात.

लिबियात हस्तक्षेप करणार्या तुर्कीवर अमेरिकेने कारवाई करावीदोन दिवसांपूर्वी तुर्की व माल्टाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लिबियाचा दौरा करून सराज सरकारला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर लिबियातील शस्त्रतस्करी रोखण्यासाठी नाटो’ने भूमध्य समुद्रात सुरू केलेल्या “इरनी” या नौदल मोहिमेवरही तुर्की व माल्टाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी टीका केली होती. त्याच्या पुढच्या काही तासात अमेरिकेने तुर्की व माल्टाशी संबंधित कंपन्यांवर ही निर्बंधांची कारवाई केली आहे. तर, जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांनी देखील लिबियातील गटांना शस्त्रसज्ज करुन युरोपिय महासंघाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या तुर्कीवर निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. या शस्त्रतस्करीमध्ये सहभागी असलेल्या तुर्की तसेच लिबियन आणि कझाकस्तानच्या कंपन्यांवर युरोपिय देश निर्बंध लादणार आहे.

leave a reply