अमेरिका बगराम हवाईतळ अफगाणी लष्कराकडे सोपविणार

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात घडविलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये पाच जणांचा बळी गेला तर 25 जण जखमी झाले. अमेरिकी लष्कराच्या माघारीबरोबर तालिबानचे या देशातील हल्ले वाढत चालल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. अशावेळी अमेरिका अफगाणिस्तानातील सर्वात मोठे हवाईतळ बगराम देखील अफगाणी लष्कराच्या हवाली करून जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

अमेरिका बगराम हवाईतळ अफगाणी लष्कराकडे सोपविणारअफगाणिस्तानातील अमेरिकेचा सर्वात मोठा तळ म्हणून बगराम हवाईतळाचा उल्लेख केला जातो. अफगाणिस्तानच्या पारवान प्रांतातील या तळावर साडे तीन हजार मीटर लांबीची धावपट्टी आहे. बगराम हवाईतळावरील हँगर्स, लष्करी इमारतींची संख्या मोठी असून इथे भुयारी तळ आणि कारागृहे असल्याचाही दावा केला जातो. दशकभरापूर्वी अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या अल कायदा व तालिबानच्या दहशतवाद्यांना इथल्याच तुरुंगात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

अमेरिकेचे सर्वात मोठे तळ असल्यामुळे बगराम हवाईतळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले केले होते. पण या हल्ल्यांमध्ये सदर तळाचे फारसे नुकसान झाले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून माघारीची घोषणा केली. तेव्हा अमेरिका अफगाणिस्तानातील इतर लष्करीतळांप्रमाणे बगरामचा देखील ताबा सोडणार का? असा प्रश्‍न विचारला जात होता.

अमेरिकेने यावर अधिकृत स्तरावर कोणतीही घोषणा केलेली नाही. पण अफगाणी वृत्तवाहिनीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या दाव्यानुसार, पुढच्या तीन आठवड्यात अमेरिका बगराम हवाईतळ अफगाणी लष्कराकडे सोपविणार आहे. अमेरिकी लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती देत असल्याचे अफगाणी वृत्तवाहिनीने म्हटले आहे. त्यामुळे बगराम हवाईतळ अफगाणी लष्कराच्या हवाली करण्याचा अमेरिकेचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.अमेरिका बगराम हवाईतळ अफगाणी लष्कराकडे सोपविणार

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो. मंगळवारी सकाळी पारवान प्रांताची राजधानी चारीकार भागात दहशतवाद्यांनी घडविलेल्या कारबॉम्बस्फोटात एकाचा बळी गेला. चारीकारपासून बगराम हवाईतळ 11 किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या चार दिवसात पारिवान प्रांतात झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.

तर सोमवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात तालिबानने घडविलेल्या कारबॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला. यासाठी दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या लष्कराच्या हमवी वाहनाचा वापर केला. या स्फोटाचे हादरे पाचशे मीटर अंतरापर्यंत जाणवले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी कारवाईवर परिणाम होऊ नये, यासाठी अमेरिका शेजारी देशांमध्ये लष्करी तळ शोधत आहे. पाकिस्तानातील लष्करी तळांबाबत निर्णय झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण पाकिस्तान सरकारने या बातम्या खोडून काढल्या आहेत. अशा परिस्थितीत, बगराम हवाईतळाचा ताबा सोडण्याचा अमेरिकेचा निर्णय लक्षवेधी असल्याचा दावा केला जातो.

leave a reply