अमेरिकेतील बेरोजगारी 1929 सालच्या महामंदीच्या स्तरावर जाईल

अमेरिकेतील बेरोजगारी 1929 सालच्या महामंदीच्या स्तरावर जाईल

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोणीही याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला इतिहासातील सर्वात मोठा व जबरदस्त धक्का बसणार आहे. १९२९ सालच्या जागतिक महामंदीप्रमाणे बेरोजगारीचे भयंकर संकट येणार आहे’, असा इशारा अमेरिकेचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार केव्हिन हॅसेट यांनी दिला. गेल्या पाच आठवड्यांच्या काळात अमेरिकेतील २.६ कोटी नागरिकांनी बेरोजगारीचे दावे दाखल केले आहेत. ही आकडेवारी अमेरिकेत उपलब्ध नोकऱ्यांच्या तुलनेत १६ टक्क्यांहून अधिक आहे. १९२९-३० साली जागतिक महामंदीच्या काळात अमेरिकेतील बेरोजगारीचे प्रमाण तब्बल २५ टक्क्यांपर्यंत गेले होते.

जगभरात फैलावलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीचा फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. कोरोनाव्हायरस साथीमुळे सध्या आवश्यक व मर्यादित स्वरूपात उद्योग चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेतील उद्योजक तसेच राज्यांची जबाबदारी असणाऱ्या गव्हर्नर्सनी येत्या काही महिन्यात अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याची शक्यता नसल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ सल्लागार हॅसेट यांनी व्यक्त केलेली चिंता लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीवन एमनुकिन यांनीही अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर येण्यासाठी जुलै ते सप्टेंबरचा कालावधी उजाडेल, असे वक्तव्य केले आहे. ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एमनूकिन यांनी, अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे प्रयत्न सुरू असून ट्रिलियन डॉलर्सचे सहाय्य करण्यात येत असल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या संसदेने शुक्रवारी सुमारे ५०० अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य मंजूर केल्याची बातमीही प्रसिद्ध झाली आहे.

अमेरिकेच्या संसदीय गटाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, २०२० सालच्या अखेरपर्यंत देशाचा जीडीपी ५.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता असून बेरोजगारीचा दर १२ टक्के राहील. तर ‘बँक ऑफ अमेरिका’चे प्रमुख ब्रायन मोयनिहान यांनी, अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास पुढच्या वर्षाची अखेर उजाडेल, असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अर्थतज्ज्ञ मार्टिन वुल्फ व ख्रिस रूकी यांनी अमेरिकेतील बेरोजगारी महामंदीचे संकेत देणारी असल्याकडे लक्ष वेधले होते. १९२९ ते १९३३ या कालावधीत अमेरिका व जगावर महामंदीचे संकट कोसळले होते. अमेरिकेतील शेअरबाजारात झालेल्या पडझडीबरोबर या महामंदीची सुरुवात झाली होती. त्यावेळी जागतिक विकास दर नकारात्मक नोंदविण्यात आला होता.

leave a reply