युक्रेनच्या सीमेवरील तणावावरुन अमेरिकेचा रशियाला नवा इशारा

- रशियासमर्थक बंडखोरांकडून सीमेवर हल्ले झाल्याचा युक्रेनचा आरोप

इशारालंडन/वॉशिंग्टन/किव्ह – युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी दिला. अवघ्या चोवीस तासात अमेरिकेने रशियाला दिलेला हा दुसरा इशारा ठरतो. काही तासांपूर्वीच अमेरिकेने रशियाला थेट आणि अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, रशियाने आपल्या सीमेजवळ किमान ८५ हजार जवानांना तैनात केल्याचा आरोप युक्रेन करीत आहे.

रशियाने युक्रेनच्या डोन्बास भागाजवळ मोठ्या प्रमाणात लष्करी जमवाजमव केली आहे. यामध्ये तोफा, रणगाडे, लष्करी वाहनांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. डोन्बासच्या सीमेजवळ दाखल झालेल्या रशियाच्या या लष्करी हालचालींचे व्हिडिओ तसेच सॅटेलाईट फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय रशिया या सीमेवर स्वयंचलित लष्करी वाहने तैनात करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. रशियाच्या लष्करी हालचालीमुळे बळ मिळालेल्या रशियासमर्थक बंडखोरांनी आपल्या सीमाभागात हल्ले सुरू केल्याचा आरोप युक्रेन करीत आहे.

इशाराशनिवारी रशियासमर्थक बंडखोरांनी पूर्वेकडील डोनेट्स्क भागात तोफांचे हल्ले चढविले. यामध्ये आपण जवान गमावला असून दुसरा जखमी झाल्याचे युक्रेनच्या लष्कराने म्हटले आहे. त्याचबरोबर येथील घरांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा युक्रेनचे लष्कर करीत आहे. २०१४ सालापासून रशियासमर्थक बंडखोरांकडून सुरू असलेल्या या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत १३ हजार जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

इशाराक्रिमिआच्या विलगिकरणानंतर रशियासमर्थक बंडखोरांना ‘नोवोरोसिया’ अर्थात नवा रशिया घडवायचा आहे. यासाठी डोन्बास भागाचे तुकडे करण्याची योजना या बंडखोरांनी आखल्याचा आरोप युक्रेनने याआधी केला होता. युक्रेनचे हे आरोप रशियाने फेटाळले आहेत. याउलट युक्रेनच्या लष्कराकडून येथील जनतेवर अत्याचार होत असल्याचा ठपका रशिया करीत आहे. तसेच युक्रेनच्या लष्कराने येथील जनतेवर लष्करी कारवाई केली तर त्याचे भयंकर परिणाम होतील, असा इशाराही रशियाने दिला होता.

२०१४ सालाप्रमाणे युक्रेन आणि रशियाच्या सीमेवर निर्माण झालेल्या या लष्करी तणावावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहे. रशियाने त्वरीत सैन्यमाघारी घेऊन हा तणाव कमी करावा, असे आवाहन ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी केले आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी रशियला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. या इशार्‍याच्या काही तास आधी अमेरिकेच्या ड्रोनने ब्लॅक सीच्या हद्दीतून टेहळणी केल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर अमेरिकी नौदलाच्या टेहळणी विमानाने देखील या भागातून प्रवास केल्याचे दावे केले जातात.

leave a reply