युक्रेनला धमकावणार्‍या रशियाला अमेरिकेकडून परिणामांचा इशारा

- अमेरिकेचे संरक्षणमंत्री मित्रदेशांच्या दौर्‍यावर रवाना

वॉशिंग्टन/किव्ह/मॉस्को – ‘युक्रेनच्या सीमेजवळ रशियन सैन्याच्या तैनातीवरून अमेरिका मित्रदेशांच्या संपर्कात आहे. यासाठी रशियाला थेट आणि अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावे लागेल. लवकरच याची घोषणा केली जाईल’, असा इशारा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी दिला. तर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन मित्रदेशांच्या दौर्‍यावर गेले असून ते नाटोच्या मुख्यालयालाही भेट देणार आहेत. ब्लॅक सीच्या क्षेत्रात अमेरिका दोन विनाशिका तैनात करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, रशियाबरोबरचा वाद चिघळलाच तर अमेरिकन जनतेवर ७१५ अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त भार पडेल, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी दिला आहे.

रशियाचे रणगाडे, लष्करी वाहने, क्षेपणास्त्र यंत्रणा आणि जवानांनी युक्रेनला घेरल्याचे फोटोग्राफ्स व बातम्या समोर येत आहेत. २०१४ साली युक्रेनकडून ताब्यात घेतलेल्या क्रिमिआमध्येच रशियाचे ३२,७०० जवान सज्ज असल्याचा दावा केला जातो. याशिवाय लुगान्स आणि डोनेट्स्कमधील रशिया समर्थक बंडखोरांना समर्थन करण्यासाठी देखील रशियन जवानांची तैनाती झाली आहे. युक्रेनने देखील डोन्बासच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती केली आहे. याशिवाय युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वाची मागणी करून रशियाला चिथावणी दिली आहे. यामुळे सहा वर्षानंतर युक्रेन-रशियाच्या सीमेवर पुन्हा एकदा संघर्षस्थिती निर्माण झाल्याचा दावा केला जातो.

या वादात अमेरिकेने उडी घेतली असून व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या साकी यांनी रशियाला इशारा दिला आहे. ‘युक्रेन तसेच इतर भागात अस्थैर्य निर्माण करण्याच्या रशियाच्या प्रत्येक कारवाईला अमेरिका उत्तर देणार, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर फोनवरुन झालेल्या पहिल्याच संपर्कात स्पष्ट केले होते. रशियाला देण्यात येणार्‍या या उत्तराची वेळ अमेरिका ठरविल’, असे साकी यांनी सांगितले.

याशिवाय युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर सैन्यतैनाती करून रशिया आपली आक्रमकता दाखवित असल्याचा आरोप साकी यांनी केला. याविरोधात अमेरिका या क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांच्या संपर्कात असल्याचे साकी यांनी सांगितले. यामध्ये युक्रेनसह युरोपमधील सहकारी आणि मित्रदेशांचा समावेश असल्याची माहिती साकी यांनी दिली. रशिया-युक्रेनचा हा वाद पेटलेला असताना, अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन ब्रिटन, जर्मनी आणि नाटोच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत.

leave a reply