सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कोरोनाव्हायरसवरुन अमेरिकेने चीनला धारेवर धरले

न्यूयॉर्क/बीजिंग – जगभरात ९७ हजारांहून अधिक जणांचा बळी घेणार्‍या कोरोनाव्हायरसचे उगमस्थान, या साथीच्या मुख्यस्त्रोताबाबतची माहिती मिळायलाच हवी, अशी आक्रमक मागणी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत केली. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत ‘केली क्राफ्ट’ यांनी चीनचा थेट उल्लेख टाळून केलेली मागणी चीनवर फार मोठे दडपण टाकणारी ठरली. म्हणूनच चीनने याप्रकरणी राजकारण करुन आपल्याला बळीचा बकरा केला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

कोरोनाव्हायरसच्या साथीबाबत चीनने जगाची फसवणूक केल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन आणि जपान सातत्याने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सुरक्षा परिषदेची विशेष बैठक घेण्याचा प्रस्ताव अस्थाई सदस्यांनी दिला होता. पण या साथीचा आणि जागतिक सुरक्षेचा थेट संबंध नाही, असे सांगून चीन व रशियाने नकाराधिकारचा वापर केला व ही चर्चा उधळून लावली. पण सध्याची स्थिती जागतिक सुरक्षेला आव्हान देणारीच असल्याचे सुरक्षा परिषदेच्या अस्थाई सदस्यांनी ठासून सांगितले. त्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुन्हा एकदा या साथीसाठी चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. ‘कुठलीही साथ रोखण्यासाठी त्याच्या विषाणूबाबतची तपशीलवार वैज्ञानिक माहिती, त्याचे उगमस्थान व फैलाव याबाबतची विस्तृत माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला वेळीच कळविणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबाबत पारदर्शकता दाखविणे अत्यंत आवश्यक आहे’, असे सांगून क्राफ्ट यांनी चीनने यापैकी कुठलीही गोष्ट केली नव्हती, याकडे अप्रत्यक्षपणे बोट ठेवले.

अमेरिकी राजदूत क्राफ्ट यांनी केलेल्या या आक्रमक मागणीवर राष्ट्रसंघातील चीनचे राजदूत ‘झँग जून’ खळवळून उठले. ‘या जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी परस्पर सामंजस्य, सहकार्य व समर्थन आवश्यक आहे. अशावेळी राजकारण करुन आणि परस्परांवर चिखलफेक करुन किंवा एखाद्या देशाला बळीचा बकरा करुन काही हाती लागणार नाही’, अशा शब्दात चीनच्या राजदूतांनी अमेरिकेला उत्तर दिले. त्याचबरोबर या साथीच्या विरोधातील लढ्यात चीन देत असलेल्या योगदानच्या माहितीचे झँग यांनी वाचन केले.

राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वाखाली चीनने या साथीवर मात केल्याचा दावा झँग यांनी केला. त्याचबरोबर या साथीचा मुकाबला करण्यासाठी चीनने सुमारे १०० देशांना वैद्यकीय सहाय्य, तज्ञांचे पथक पाठविल्याचे झँग म्हणाले. चीनच्या राजदूतांनी चीनची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता नाही. गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेबरोबरच ब्रिटन, ब्राझिल, स्पेन, तुर्की, जॉर्जिया, झेक प्रजासत्ताक आणि इतर देशांनी चीनकडून मिळालेली मेडिकल किट्स व इतर उपकरणे सदोष व निकृष्ठ दर्जाचे असल्याचे, यासाठी चीनवर सडकून टीका केली होती. तसेच जगभरात हजारो जणांचा बळी जात असताना, चीन याच्याकडे व्यापारी संधी म्हणून पाहत आहे, असा आरोपही जोर पकडू लागला आहे. म्हणूनच जगभरात मेडिकल किट्स, मास्क इत्यादींची प्रचंड प्रमाणात मागणी वाढली असताना, चीन निकृष्ठ दर्जाचे साहित्य पुरवून त्यातून नफा कमवित असल्याचे आरोप आंतरराष्ट्रीय माध्यमांधये प्रसिद्ध होत आहेत. चीनमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव वाढलेला असताना, इटलीने मानवतावादी दृष्टीकोनातून पाठविलेल्या वैद्यकिय सहाय्याचा वापर आपल्या जनेतेसाठी न करता, चीनने ईटलीलाच याची विक्री केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील चीनची प्रतिमा ढासळली आहे. त्यातच जगावर ओढवलेल्या या संकटाला चीनच जबाबदार असल्याचे आरोप अधिकच तीव्र बनत चालले आहे. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेच्या राजदूत क्राफ्ट यांनी केलेली मागणी चीनच्या विरोधातील राजनैतिक आघाडीचे संकेत देत आहे. त्याला तोंड देणे चीनसाठी अधिकाधिक अवघड बनत जाईल, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

leave a reply