अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’मधून बाहेर पडली

वॉशिंग्टन – कोरोना साथीच्या मुद्द्यावर सातत्याने चीनची बाजू घेणाऱ्या ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘डब्ल्यूएचओ’ मधून अमेरिका बाहेर पडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भातील पत्र संयुक्त राष्ट्रसंघ व अमेरिकी संसदेला पाठविले आहे. अमेरिका हा ‘डब्ल्यूएचओ’ला सर्वाधिक फंडिंग करणारा देश असल्याने ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयाचा आरोग्य संघटनेसह चीनला जबरदस्त धक्का बसल्याचे मानले जाते.

'डब्ल्यूएचओ'

मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघ व अमेरिकी संसदेला ‘डब्ल्यूएचओ’तुन बाहेर पडण्याचे पत्र दिल्याचे जाहीर करण्यात आले. ‘डब्ल्यूएचओ’च्या तरतुदींनुसार, सदस्य देशाला संघटनेतून बाहेर पडायचे असल्यास एक वर्ष आधी यासंदर्भातील पत्र देणे बंधनकारक आहे. या तरतुदीनुसार, अमेरिकेने पत्र दिले असून जुलै २०२१पासून अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’चा सदस्य नसेल अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्यांनी दिली. अमेरिकेच्या संसदेनेही राष्ट्राध्यक्षांचे पत्र मिळाल्याचे सांगितले असून या निर्णयामुळे कोरोना साथीच्या काळात अमेरिका एकाकी पडेल, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसची साथ जगभरात पसरण्यास सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनसह ‘डब्ल्यूएचओ’लाही लक्ष्य केले होते. ‘चीनच्या वुहानमध्ये या साथीचा उद्रेक झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने आपले निरिक्षक पाठवून याची चौकशी करणे अपेक्षित होते. त्याऐवजी या साथीबाबत लपवाछपवी करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना ‘डब्ल्यूएचओ’ने साथ दिली. त्यामुळे चीनच्या एका भागातच रोखता येऊ शकणाऱ्या या साथीचे जागतिक महामारीत रूपांतर झाले व आज जग त्याची जबरदस्त किंमत चुकती करीत आहे. हे सारे ‘डब्ल्यूएचओ’च्या बेजबाबदारपणामुळे घडले आहे’,अशा शब्दात ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ला फटकारले होते.

'डब्ल्यूएचओ'

एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’चे फंडिंग रोखण्याची घोषणा केली होती. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सचे अर्थसहाय्य करणाऱ्या अमेरिकेला यापुढे हा निधी अधिक चांगल्या पद्धतीने वापरायचा आहे. म्हणूनच अमेरिकी अधिकाऱ्यांना डब्ल्यूएचओला पुरविले जाणारे अर्थसहाय्य रोखण्याचे आदेश दिले आहेत, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘डब्ल्यूएचओ’ला धक्का दिला होता.

त्यानंतर ट्रम्प यांनी, डब्ल्यूएचओमध्ये सुधारणांची मागणी करून त्या झाल्या नाहीत तर अमेरिका बाहेर पडेल अशी धमकी दिली होती. संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र पाठवून ट्रम्प यांनी आपली ही धमकी खरी केल्याचे दिसत आहे. ‘डब्ल्यूएचओ’ला मिळणाऱ्या निधीपैकी १५ ते २० टक्के निधी एकट्या अमेरिकेकडून देण्यात येतो. अमेरिका बाहेर पडल्याने डब्ल्यूएचओला मिळणारा हा निधी बंद होणार असून त्याचे मोठे परिणाम संघटनेच्या कार्यावर होऊ शकतात, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

leave a reply