चीनकडून साऊथ चायना सी मधील सरावात बॉम्बर्सचा वापर

- अमेरिकेसह तैवानला इशारा दिल्याचा दावा

बीजिंग – चीनकडून साऊथ चायना सीमध्ये सुरू असलेल्या सरावात प्रगत बॉम्बर्सचा वापर करण्यात आल्याची माहिती चीनच्या संरक्षण विभागाने दिली. अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकांचा वाढता वावर आणि तैवानकडून संरक्षणसज्जतेसाठी सुरू असणाऱ्या हालचाली, या पार्श्वभूमीवर चिनी बॉम्बर्सचा सहभाग लक्ष वेधून घेणारा ठरतो. सरावात झालेला बॉम्बर्सचा वापर हा अमेरिकेसह तैवानला इशारा असल्याचा दावा चिनी विश्लेषक व माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. दरम्यान, चीनकडून ‘ॲम्फीबियस ॲसॉल्ट शिप’ व ‘कॉम्बॅट ड्रोन्स’ विकसित करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे समोर आले आहे.

South-China-seaगेल्या आठवड्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने साऊथ चायना सी क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ड्रिल’ला सुरुवात केली होती. ग्वांगडाँग प्रांतासह नजिकच्या सागरी क्षेत्रात घेण्यात आलेल्या ह्या सरावात चीनचे हवाईदल, नौदल व रॉकेट फोर्सेस सहभागी झाल्याचे सांगण्यात आले होते. चीनकडून साऊथ चायना सीमध्ये आयोजित करण्यात आलेला हा दुसरा युद्धसराव आहे. या सरावापूर्वी काही दिवस आधीच अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. तैवाननेही आपली संरक्षणसज्जता दाखवून देण्यासाठी पाच दिवसांचा मोठा सराव आयोजित केला होता. त्यामुळे चीनने सुरू केलेला सराव अमेरिका व तैवानला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केल्याचे मानले जात होते.

याच सरावात, चीनच्या ‘एच-६जी’ व ‘एच-६जे’ या प्रगत बॉम्बर्सनी रात्रीच्या वेळेत सहभाग घेतल्याचे सांगण्यात येते. ड्रिलदरम्यान या विमानांकडून समुद्रातील लक्ष्यांवर हल्ले चढविणे तसेच ‘लॉंग रेंज रेड्स’ यांचा सराव करण्यात आल्याची माहिती चीनच्या संरक्षण विभागाने दिली. चीनचा हा सराव साऊथ चायना सी क्षेत्रातील अधिक चिघळत चालल्याचे संकेत देणारा ठरतो. या सरावाच्या पार्श्वभूमीवरच चीन आपली युद्ध क्षमता वाढविण्यासाठी वेगाने हालचाली करीत असल्याचे समोर येत आहे.

South-China-seaचीनकडून ‘ॲम्फीबियस ॲसॉल्ट शिप’ विकसित करण्याच्या योजनेला वेग देण्यात आला आहे. या प्रगत युद्धनौकांवर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, लष्करी पथके यांच्यासह ‘कॉम्बॅट ड्रोन्स’ही तैनात करण्यात येतील अशी माहिती उघड झाली आहे. लढाऊ विमानांच्या उड्डाणासाठी या युद्धनौकांवर ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक लॉन्च सिस्टीम’ बसविण्यात येईल, अशी माहिती देण्यात येत आहे. या योजनेला ‘प्रोजेक्ट एक्सएक्स ६’ असे नाव देण्यात आले आहे. या नव्या प्रकारातील युद्धनौकांबरोबरच चीन पुढील काळात ‘ड्रोन वॉरफेअर’वर अधिक भर देईल, अशीही माहिती समोर आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात हवाईदलाला संबोधित करताना, ड्रोन्समध्ये युद्धाची स्थिती बदलण्याची क्षमता आहे असे वक्तव्य करून त्यावर अधिक भर देण्याची सूचना केली. चिनी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

leave a reply