अफगाणिस्तानचा वापर करून चीन पाकिस्तानला भारताविरोधात बळ पुरविल

- अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी निक्की हॅले

निक्की हॅलेवॉशिंग्टन – अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ चीनच्या हाती सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तळाचा वापर करून चीन पाकिस्तानला अफगाणिस्तानात अधिक बळ पुरविल आणि त्याचा भारताच्या विरोधात वापर करील, असा इशारा अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी निक्की हॅले यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीनंतर दहशतवादी संघटनांचा जोश वाढला असून यामुळे दहशतवादी हल्ल्यांचा धोका अधिकच बळावला आहे, याकडे निक्की हॅले यांनी लक्ष वेधले. अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना हॅले यांनी बायडेन यांनी बेजबाबदारपणे घेतलेल्या माघारीचे हे भयंकर परिणाम असल्याचे आसूड ओढले.

पाकिस्तान आणि चीन अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी सहकार्य वाढविणार असल्याची घोषणा चीनमधील पाकिस्तानचे राजदूत मोईन उल हक यांनी केली. पण दहशतवाद्यांचे पाठिराखे असलेल्या या देशांकडून या घोषणेच्या नेमकी उलट कारवाई अपेक्षित आहे. दहशतवादाचा पुरस्कार करणारा पाकिस्तान व त्याला सर्वतोपरी सहाय्य करणारा चीन, दहशतवाद्यांच्या विरोधात नाही, तर भारताच्या विरोधात दहशतवाद्यांना आवश्‍यक असलेले सहाय्य पुरविण्यासाठी उत्सुक असण्याची अधिक शक्यता आहे. अमेरिकेच्या माजी राजनैतिक अधिकारी निक्की हॅले यांनी हा धोका अधोरेखित केला.

अफगाणिस्तानातील बगराम हवाई तळ चीनकडे सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अमेरिकेचा हा अत्यंत महत्त्वाचा तळ त्यावरी शस्त्रास्त्रे, लष्करी वाहने व संरक्षणसाहित्यासहीत तालिबानच्या ताब्यात गेला आहे. चीन हा तळ ताब्यात घेण्यासाठी विशेष उत्सुकता दाखवित असल्याचे समोर येत आहे. सध्या तालिबानला अफगाणिस्तानचा कारभार चालविण्यासाठी निधीची आवश्‍यकता आहे. तालिबानला हवे असलेले अर्थसहाय्य पुरविण्याचे चीनने आधीच जाहीर केले होते. याच्या मोबदल्यात चीन तालिबानकडून काही गोष्टींची मागणी करू शकेल. यामध्ये बगराम हवाई तळाच्या ताब्याचा समावेश असू शकतो.

बगराम हवाई तळ चीनच्या ताब्यात जाईल व इथे चीन पाकिस्तानला प्रस्थापित करील. अशारितीने अफगाणिस्तानात पाकिस्तानला अधिक बळ पुरवून चीन पाकिस्तानचा भारताच्या विरोधात वापर करील, असा इशारा निक्की हॅले यांनी दिला. संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत हॅले यांनी याविरोधात बायडेन प्रशासनाला सावध केले आहे. याबरोबरच अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची हॅले यांनी बायडेन प्रशासनाला जाणीव करून दिली.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे आपला विजय झाल्याचे दहशतवादी संघटना मानत आहेत. यामुळे दहशतवादी संघटनांचा जोश वाढला असून लवकरच या संघटना मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची भरती करतील. तसेच एकांड्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याची दाट शक्यताआहे. तर अमेरिकेच्या प्रतिहल्ल्याची शक्यता मावळल्याने रशियासारखा देश अमेरिकेवर सायबर हल्ले चढवू शकेल. चीनच्या कारवायांवरही बारकाईने नजरठेवावी लागेल, असे इशारे निक्की हॅले यांनी दिली. तसेच तैवान, जपान, ऑस्ट्रेलिया व भारत या देशांना आवश्‍यकता भासल्यास अमेरिका धावून येईल, हा विश्‍वास देणे अतिशय आवश्‍यक आहे. आपल्या सहकारी देशांमध्ये हा विश्‍वास प्रस्थापित करण्यासाठी बायडेन प्रशासनाने वेगाने पावले उचलावी, अशी अपेक्षा हॅले यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, पाकिस्तान व चीन अफगाणिस्तानचा वापर भारताच्या विरोधात करण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानच्या भूमीचा भारत तसेच अन्य देशांच्या विरोधात वापर होऊ देणार नाही, असे आश्‍वासन तालिबानने दिले आहे. पण तालिबानच्या शब्दांवर विश्‍वासठेवता येणार नाही, असे माजी लष्करी अधिकारी व सामरिक विश्‍लेषक भारत सरकारला बजावत आहेत. त्याचवेळी तालिबान पूर्णपणे चीन व पाकिस्तानच्या प्रभावाखाली जाणार नाही, यासाठी भारताने तालिबानबरोबर किमान पातळीवरील तरी वाटाघाटी व चर्चा सुरू ठेवणे गरजेचे आहे, असा सल्ला काही सामरिक विश्‍लेषक देत आहेत.

leave a reply