अफगाणिस्तानातील गोंधळ निस्तारण्यासाठी पाकिस्तानचा वापर करून अमेरिकेला भारताला धोरणात्मक सहकारी बनवायचे आहे

- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची तक्रार

धोरणात्मक सहकारीइस्लामाबाद – ‘गेल्या दोन दशकात अफगाणिस्तानात आपण घातलेला गोंधळ निस्तारण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची उपयुक्तता वाटत आहे. पण अमेरिकेने धोरणात्मक सहकारी म्हणून मात्र भारताची निवड केलेली आहे. पाकिस्तानच्या चीनबरोबरील सहकार्यामुळे अमेरिका पाकिस्तानला अशी दुय्यम वागणूक देत असावा’, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी आपले दुखणे जगासमोर मांडले. त्याचवेळी अमेरिका व अफगाणिस्तानचे सरकार आपल्या चुकीचे खापर पाकिस्तानवर फोडून पाकिस्तानला बळीचा बकरा बनवित असल्याचा आरोप इम्रानखान यांनी केला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेली ही विधाने फार मोठ्या उलथापालथींचे संकेत देत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आपल्या देशावर कडक निर्बंध लादण्याची तयारी करीत असल्याची चर्चा पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. याची जाणीव झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान यासाठी आपल्या जनतेला तयार करीत असल्याचे दावे काही पत्रकारांनी केले होते. इम्रानखान यांनी पत्रकार परिषदेत अमेरिकेवर केलेली टीका या प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसते. गेल्या दोन दशकात अमेरिकेने अफागणिस्तानात जो काही गोंधळ घातला, तो निस्तारण्याची अपेक्षा पाकिस्तानकडून ठेवली जात आहे. मात्र अमेरिकेने एकाएकी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतले आणि त्यामुळे आपण हे युद्ध जिंकलो आहोत, असा तालिबानचा समज झाला आहे. यामुळे तालिबानवरील पाकिस्तानचा प्रभाव संपुष्टात आलेला आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान इम्रान खान यांनी दिले.

प्रत्यक्षात पाकिस्तानला तालिबानवर प्रभाव राहिलेला नाही. पण अफगाणिस्तानचे सरकार मात्र यासाठी पाकिस्तानला धारेवर धरत आहे, अशी टीका पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्रकार परिषदेत केली. तसेच अमेरिकेबरोबरील पाकिस्तानचे संबंध ताणलेले आहेत, याची कबुलीही यावेळी इम्रानखान यांनी देऊन टाकली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर आपल्याला फोन केलेला नाही, पण आपण देखील त्यांच्या फोनची प्रतिक्षा करीत नाही, असे सांगून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी फार मोठा बाणेदारपणा दाखविलेला आहे. आधीच्या काळात इम्रानखान यांनी केलेल्या अशा आक्रमक विधानांची किंमत पाकिस्तानला चुकती करावी लागल्याचे इशारे या देशाचे विश्‍लेषक देत आहेत. तरीही पंतप्रधान इम्रान खान यांनी बेताल विधानांचे सत्र सुरू ठेवले आहे.

अमेरिका भारताबरोबर धोरणात्मक भागीदारी विकसित करीत आहे व पाकिस्तानचा वापर अफगाणिस्तानातील सफाईसाठी करीत आहे, अशी खंत जाहीरपणे व्यक्त करून इम्रानखान यांनी फार मोठे धाडस दाखविले खरे. मात्र यामुळे त्यांच्यावरील टीका अधिकच तीव्र होऊ शकते. इम्रानखान यांना परराष्ट्र संबंध व धोरण यांचा काडीचाही अनुभव नाही. आपल्या विधानांचे किती गंभीर परिणाम संभवतात, हे देखील ते लक्षात घ्यायला तयार नाहीत, असा ठपका पाकिस्तानचे विश्‍लेषक ठेवत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या धोरणावर पुन्हा एकदा टीका करून इम्रानखान यांनी पाकिस्तानसमोरील अडचणी वाढविल्या आहेत.

अमेरिकाच नाही तर सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीसारखे देश देखील अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारताने महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशी मागणी करीत आहे. काही दिवसांपूर्वी इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी देखील अफगाणिस्तानातील भारताच्या भूमिकेचे स्वागत केले होते. भारताला अफगाणिस्तानात स्थैर्य व विकास अपेक्षित आहे, तर पाकिस्तानला अफगाणिस्तानात तालिबानची राजवट हवी आहे, याची जाणीव जगभरातील देशांना झालेली आहे. तसेच यापासून असलेला धोकाही प्रमुख देशांना स्पष्टपणे जाणवतो आहे. म्हणूनच अफगाणिस्तानात भयंकर रक्तपात घडवून मुले व महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानच्या दहशतवाद्यांना सहाय्य करणाऱ्या पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्याची मागणी सुरू झाली आहे.

या मागणीच्या मागे भारताचे पाकिस्तानविरोधी कारस्थान असल्याचे आरोप पाकिस्तानकडून केले जातात. मात्र तालिबान अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या दिशेने आगेकूच करीत असताना, अमेरिकेने तालिबानसह पाकिस्तानवर कठोर निर्बंध लादण्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार व विश्‍लेषक अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देण्याची तयारी करा, असे पाकिस्तानी जनतेला सांगत आहेत. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था भयंकर संकटात आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने निर्बंध लादले, तर पाकिस्तानात हाहाकार माजेल, असा इशाराही या पत्रकार तसेच विश्‍लेषकांनी दिलेला आहे.

leave a reply