बिटकॉईनचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य एक ट्रिलियन डॉलर्सवर

वॉशिंग्टन – जगातील आघाडीची क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखण्यात येणार्‍या ‘बिटकॉईन’चे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य एक ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. शुक्रवारी एका बिटकॉईनचे मूल्य ५६,२५० डॉलर्सच्या विक्रमी स्तरापर्यंत गेले असून अवघ्या सात दिवसांच्या अवधीत ११ टक्क्यांहून अधिक उसळी घेतल्याचे दिसून आले आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनी, दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा करण्याचे साधन म्हणून क्रिप्टोकरन्सीज्चा वाढता वापर होत असून ही एक मोठी समस्या बनली आहे, असा इशारा दिला होता.

Advertisement

सुमारे १२ वर्षांपूर्वी ‘ब्लॉकचेन’ या तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉईन या व्हर्च्युअल करन्सीची सुरुवात झाली होती. माहिती व तंत्रज्ञान तसेच गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांमध्ये या करन्सीबाबत चांगलेच आकर्षण असून बहुतांश व्यवहारही याच क्षेत्रातून केले जातात. या करन्सीवर कोणतीही संस्था अथवा व्यक्तीचे नियंत्रण नसल्याचे सांगण्यात येत असून, बिटकॉईनच्या धर्तीवर अनेक क्रिप्टोकरन्सी गेल्या दशकभरात सक्रिय झाल्या आहेत. मात्र बिटकॉईनसह या क्रिप्टोकरन्सींचा वापर गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी गट तसेच हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून अनेक देशांनी त्याच्या अधिकृत व्यवहारांवर बंदीही घातली आहे.

असे असतानाही बिटकॉईनच्या दरांनी नव्या वर्षात घेतलेली जबरदस्त उसळी लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस बिटकॉईनचा दर २९, ३८८ डॉलर्स होता. त्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत त्यात सुमारे ९० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामागे अमेरिकेतील अनेक आघाडीचे उद्योजक व वित्तसंस्थांकडून बिटकॉईनमध्ये करण्यात येणारी गुंतवणूक तसेच त्यातील व्यवहारांबाबत घेण्यात आलेले निर्णय हा महत्त्वाचा घटक ठरल्याचे सांगण्यात येते.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आतापर्यंत फक्त चार कंपन्यांना एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. त्यात अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन व गुगल यांचा समावेश आहे. कोणतेही नियंत्रण नसणार्‍या अनेक देशांनी बेकायदेशीर ठरविलेल्या बिटकॉईनने या स्तरापर्यंत घेतलेली विक्रमी झेप चर्चेचा विषय ठरली आहे. जगातील अनेक आघाडीचे अर्थतज्ज्ञ तसेच गुंतवणुकदारांनी बिटकॉईनस एकूणच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांबाबत सातत्याने सावधगिरीचे इशारे दिले आहेत.

अमेरिकेतील आघाडीचे गुंतवणूकदार जिम रॉजर्स यांनी काही दिवसांपूर्वी क्रिप्टोकरन्सीबाबत इशारा दिला होता. गेल्या काही वर्षात अनेक क्रिप्टोकरन्सीज् आल्या व गायबही झाल्या आणि काही पूर्णपणे धुळीसही मिळाल्या आहेत, याची जाणीव रॉजर्स यांनी करून दिली. त्याचवेळी बिटकॉईन हा अर्थव्यवस्थेतील बुडबुडा असल्याचेही त्यांनी बजावले. आपण कधीही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केली नसल्याचेही रॉजर्स यांनी सांगितले होते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच माजी अर्थमंत्री स्टिव्हन एम्नुकिन यांनीही बिटकॉईनसह इतर क्रिप्टोकरन्सीज्बाबत धोक्याचे इशारे दिले आहेत. क्रिप्टोकरन्सी हा अमेरिकेसाठी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनला आहे, असे माजी अर्थमंत्री एम्नुकिन यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या नव्या अर्थमंत्री जॅनेट येलेन यांनीही गेल्या दीड महिन्यात तीनदा क्रिप्टोकरन्सीच्या वाढत्या धोक्याबद्दल जाणीव करून दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी कारवायांसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालातही, दहशतवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात क्रिप्टोकरन्सीज्चा वापर होत असल्याचे बजावले होते.

leave a reply