अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला 1971 सालच्या पराभवाची आठवण करून दिली

काबुल/इस्लामाबाद – ‘अफगाणिस्तानातील काही मूठभर मंडळी पाकिस्तानचे अफगाणिस्तानबरोबरील संबंध कलुषित करण्यासाठी विष ओकत आहेत. त्यांनी मुर्खपणे केलेली विधाने अफगाणिस्तानला लाज आणणारी ठरतात’, अशी टीका पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी केली. 1971 सालच्या भारतासमोर पाकिस्तानने स्वीकारलेल्या शरणांगतीचा फोटोग्राफ अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. अफगाणिस्तानच्या इतिहासात असा फोटो सापडणार नाही, असे सांगून अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला चपराक लगावली होती. त्यावर संतापलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी सोशल मीडियावर ही शेरेबाजी केली.

Advertisement

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला 1971 सालच्या पराभवाची आठवण करून दिलीअफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ तालिबानने रॉकेट हल्ला चढविला होता. यावेळी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी व उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्यासह इतर अफगाणी नेते उपस्थित होते. हा हल्ला झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष सालेह स्वाभाविकपणे विचलित झाले. याचा व्हिडिओ पोस्ट करून पाकिस्तानातील काहीजणांनी सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांची टर उडविण्याचा प्रयत्न केला. त्याला उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले.

1971 सालच्या युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी लष्कराचे जनरल नियाझी या शरणांगतीच्या करारावर स्वाक्षरी करतानाचा जगप्रसिद्ध फोटो सालेह यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. ‘रॉकेट हल्ल्यानंतर मी काही क्षणांसाठी नक्कीच विचलित झालो होते. पण अफगाणिस्तानच्या इतिहासात अशारितीने शरणांगती पत्करताना कुठलाही फोटो आढळणार नाही. तालिबान आणि दहशतवाद पाकिस्तानला झालेली ही जखम भरून निघणार नाही. यासाठी तुम्हाला वेगळे मार्ग शोधावे लागतील’, अशी चपराक देणारा संदेश सालेह यांनी या फोटोसोबत दिला.

पाकिस्तानी ट्रोलर्सना अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी दिलेले हे सणसणीत प्रत्युत्तर पाकिस्तानला चांगलेच झोंबले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी याची दखल घेतली. अफगाणिस्तानातील काही मूठभर मंडळी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संबंध कलुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही, असा दावा मोईद युसूफ यांनी केला. तसेच मुर्खासारखी विधाने करून ही मंडळी अफगाणिस्तानला लाज आणत आहे. त्याची कारस्थाने आता जगजाहीर झालेली आहेत, असा दावा मोईद युसूफ यांनी केला.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला 1971 सालच्या पराभवाची आठवण करून दिलीदरम्यान, पाकिस्तानचे कडवे टीकाकार अशी ओळख असलेले अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानातील हिंसाचारामागे पाकिस्तान असल्याचा थेट आरोप केला होता. इतकेच नाही तर अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरचे स्पिन बोल्दाक तालिबानच्या हातून सोडविण्यासाठी हवाई हल्ले चढवू पाहणार्‍या अफगाणी लष्कराला, पाकिस्तानने हवाई हल्ल्याची धमकी दिली होती, याचा पर्दाफाश उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी केला. याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे सालेह म्हणाले होते.

तसेच पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या लेकीचे अपहरण व तिचा छळ याच्या विरोधात उपराष्ट्राध्यक्ष सालेह यांनी कठोर भूमिका स्वीकारून पाकिस्तानवर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे पाकिस्तानातून सालेह यांच्यावर सर्वाधिक टीका होत आहे. सालेह भारतधार्जिणे असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जात आहे. पण या टीकेला सालेह यांनी दिलेले उत्तर पाकिस्तानला बिथरविणारे ठरले. अफगाणिस्तान व पाकिस्तानचे संबंध भारत बिघडवित असल्याचा दावा पाकिस्तान करीत आहे. मात्र तालिबानला पाकिस्तानकडून पुरविले जाणारे सहाय्य हेच अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील समस्येचे मूळ आहे. ही बाब मान्य करण्यास पाकिस्तान तयार नाही. उलट तालिबानला शक्य तितके सहाय्य पुरविणे, हा आपल्या कर्तव्याचा भाग असल्याचे पाकिस्तानला वाटत आहे. म्हणूनच अफगाणिस्तानचे सरकार आणि जनतेमध्ये पाकिस्तानच्या विरोधात असंतोष खदखदत आहे.

leave a reply