इराणकडून अमेरिकी ड्रोनवर वॉर्निंग शॉट

- युएईने सुरक्षा परिषदेत सागरी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला

वॉर्निंग शॉटतेहरान/दुबई – होर्मुझच्या आखातातून प्रवास करणाऱ्या अमेरिकेच्या ‘एमक्यू-9’ ड्रोनवर इराणच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने वॉर्निंग शॉट झाडला. इराणच्या वृत्तवाहिन्यांनी याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. दोन आठवड्यांपूर्वी इस्रायलच्या इंधनवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यासाठी इराणच जबाबदार असल्याचा आरोप अमेरिका व ब्रिटन करीत आहे. अशा परिस्थितीत, इराणने अमेरिकन ड्रोनवर वॉर्निंग शॉट झाडून अमेरिकेसह ब्रिटनला इशारा दिल्याचा दावा केला जातो. दरम्यान, पर्शियन आखातातील सागरी सुरक्षेला आंतरराष्ट्रीय समुदायाने महत्त्व द्यावे, असे आवाहन युएईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केले.

अफगाणिस्तान, इराकमध्ये दहशतवाद्यांवरील कारवाईसाठी वापरले जाणारे अमेरिकेचे ‘एमक्यू-9’ रिपर ड्रोन होर्मुझच्या आखातातून प्रवास करताना हा प्रकार घडला. इराणमधील दोन वृत्तवाहिन्यांनी रिपर ड्रोनवर वॉर्निंग शॉट झाडल्याचा इराणच्या कंट्रोल रूममधील व्हिडिओ प्रसिद्ध केला. इराणमधील माध्यमे वॉर्निंग शॉटच्या कारवाईबाबत बुधवार तसेच गुरुवार सकाळचा दाखला देत आहेत. त्यामुळे इराणने नेमकी ही कारवाई कधी केली, याबाबत प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर अमेरिकेने यावर बोलण्याचे टाळलेआहे.

वॉर्निंग शॉटयाआधी 2019 साली इराणने होर्मुझच्याच आखातात अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. तर अन्य एका घटनेत ओमानच्या आखातातील दोन इंधनवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यावेळीही इराणने अमेरिकी रिपर ड्रोन पाडण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पर्शियन आखातापासून हिंदी महासागरापर्यंतच्या क्षेत्रात तणाव निर्माण झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी ओमानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास करणाऱ्या इस्रायलच्या इंधनवाहू जहाजावर ड्रोन्सचे हल्ले झाले. इराण किंवा इराणसंलग्न गटांनी हे हल्ले घडविल्याचा आरोप इस्रायल, अमेरिका, ब्रिटन व युरोपिय महासंघाने केला.

इराणने हे आरोप धुडकावले होते. तसेच इस्रायल आणि पाश्‍चिमात्य देशांना धमकावले होते. इस्रायल आणि ब्रिटननेही इराणला उत्तर देण्याची घोषणा केली. यासाठी ब्रिटनचे स्पेशल फोर्सेसचे जवान येमेनच्या पूर्वेकडे उतरल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर इस्रायलची पाणबुडी रेड सीच्या क्षेत्रात पाहिल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केले होते. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या रिपर ड्रोनवर वॉर्निंग शॉट झाडून इराणने इस्रायल, अमेरिका आणि ब्रिटनला इशारा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पर्शियन आखात ते रेड सीपर्यंतच्या सागरी क्षेत्रात तणाव वाढला आहे. या क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या मालवाहू तसेच इंधनवाहू जहाजांना लक्ष्य केले जात आहे. ‘संयुक्त अरब अमिरात-युएई’ने सागरी सुरक्षेचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित केला. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पहावे आणि या सागरी क्षेत्राच्या सुरक्षेसाठी पावले उचलावी, असे आवाहन युएईने केले.

leave a reply