पाश्‍चिमात्य देशांनी मर्यादा ओलांडू नये

-रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

पाश्‍चिमात्यमॉस्को – ‘रशियाला पाश्‍चिमात्य देशांबरोबर संबंध तोडायचे नाहीत. पण जर एखाद्याने रशियाच्या सदिच्छांना आमचा कमकुवतपणा मानला, तर मग मात्र त्याला जोरदार, त्वरित आणि कठोर उत्तर दिले जाईल. या मर्यादा कोणत्या याचा निर्णय रशियाच घेईल’, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. युक्रेन, ऍलेक्सी नॅव्हॅल्नी आणि बेलारूसच्या मुद्यांवरुन रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका व युरोपिय देशांना हा इशारा दिला. दरम्यान, बाल्टिकच्या समुद्रात रशियाच्या लढाऊ, बॉम्बर आणि टेहळणी विमानांनी नाटो सदस्य देशांच्या हवाई हद्दीवरुन उड्डाण केल्याचा आरोप नाटोने केला आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी रशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी कोरोनाच्या विरोधात आपल्या सरकारने केलेल्या कारवाईची आणि आर्थिक विकासासाठी उचललेल्या पावलांची प्रामुख्याने माहिती दिली. तर शेवटच्या काही मिनिटांमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पाश्‍चिमात्य देश रशियाच्या स्थैर्याला धोका निर्माण करीत असल्याचा आरोप केला. यासाठी युक्रेन आणि बेलारूसमध्ये पाश्‍चिमात्य देश रशियाविरोधात हस्तक्षेप करीत असल्याचा ठपका रशियन राष्ट्राध्यक्षांनी ठेवला.

पाश्‍चिमात्ययापैकी बेलारूसच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अधिक जोर दिला. काही दिवसांपूर्वी रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याविरोधात आखलेला बंडाचे कारस्थान उधळले होते. याप्रकरणी रशियन यंत्रणांनी दोघांना अटक केल्यानंतर अमेरिका लुकाशेंको यांचे सरकार उलथवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप रशियाने केला होता. ‘दुसर्‍या देशामध्ये बंड घडविणे आणि देशाच्या नेतृत्वाच्या खूनाचा कट आखणे, हे आता अति झाले आहे. अशा प्रकारच्या कारवाया करून संबंधित देशांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत’, अशी टीका पुतिन यांनी केली.

‘कुठलाही देश रशियाबाबत ह्या मर्यादा ओलांडणार नाही, अशी अपेक्षा आहे’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बजावले. त्याचबरोबर ‘रशियाच्या मुलभूत हितसंबंधांना धोका निर्माण झाला तर त्यांना त्यासाठी पश्‍चाताप करावा लागेल’, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी धमकावले. रशियन राष्ट्राध्यक्षांनी उल्लेख केला नसला तरी युक्रेनच्या मुद्यावरुन अमेरिका व नाटोला इशारा दिल्याचे दिसत आहे.

याशिवाय काही पाश्‍चिमात्य देशांचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रसिद्ध कथाकार रूडयार्ड किपलिंग लिखित ‘जंगल बुक’ची आठवण करून दिली. ‘जंगल बुकमध्ये ज्याप्रमाणे शेरखान या वाघाला संतुष्ट करण्यासाठी काही लांडगे प्रयत्न करीत असतात, तसाच प्रकारे काही पाश्‍चिमात्य देश अमेरिकेला खूश करण्यासाठी लांडग्यासारखे वागत आहेत’, अशी जहरी टीका पुतिन यांनी केली.

दरम्यान, रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेन, बेलारूस प्रकरणी पाश्‍चिमात्य देशांना दिलेल्या इशार्‍याला काही तास आधी रशियाच्या विमानांनी बाल्टिक समुद्राच्या क्षेत्रातून उड्डाण केले होते. यावेळी रशियाच्या लढाऊ, बॉम्बर आणि टेहळणी विमानांनी इस्तोनिया, पोलंड आणि लिथुआनिया या नाटोचा सदस्य असलेल्या देशांच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप नाटोने केला आहे. रशियाच्या या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी नाटोनेही आपली लढाऊ विमाने रवाना केली होती.

leave a reply