‘कोरोनाव्हायरस’वरून जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा

‘कोरोनाव्हायरस’वरून जागतिक आरोग्य संघटनेचा भारताला इशारा

नवी दिल्ली – भारत सरकारने देशभरात केलेल्या ‘लॉकडाउन’ची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रशंसा केली आहे. त्याचवेळी, २१ दिवसांच्या ‘लॉकडाउन’सह इतर आवश्यक उपाय केले नाहीत, तर कोरोनाव्हायरस भविष्यात पुन्हा परतेल आणि मग ही साथ रोखणे अधिक अवघड बनेल, असा इशारा ‘डब्ल्यूएचओ’ ने दिला आहे.

भारतात कोरोनाव्हायरसचा फैलाव सुरुवातीच्या अवस्थेत असतानाच सरकारने उपाययोजना हाती घेतल्या. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण भारतात ‘लॉकडाउन’ करण्यात आला. सुरुवातीच्याच टप्प्यात कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी भारताने उचललेल्या या  पावलांची प्रशंसा करायला हवी. यामुळे हे संकट गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी ते नियंत्रणात आणण्यास मदत मिळेल, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. कोरोनाव्हायरस फैलावण्यापूर्वीच त्याला संपवणे आवश्यक ठरते. या दृष्टीने उचलण्यात आलेली पावले महत्त्वाची ठरतात. भारतीय नागरिकांनी घरातून बाहेर पडणे बंद केले आहे. यासाठी भारतीय जनतेचेही कौतुक करायला हवे.

मात्र कोरोनाव्हायरसचे आव्हान केवळ ‘लॉकडाउन’ करून संपणारे नाही. भारत एक मोठा आणि मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे हे संकट एखाद्या उपायाने पूर्णपणे दूर होणारे नाही. यासाठी ‘लॉकडाउन’सह इतर व्यापक उपायांचीही आवश्यकता आहे. कोरोनाव्हायरसच्या रुग्णांना शोधून काढून त्यांच्यापर्यत पोहोचण्याची यंत्रणा विकसित करायला हवी. अशा रुग्णांना वेगळे ठेवण्याची व त्यांच्यावरील उपचारांची क्षमता वाढवायला हवी. इतरही काही सुरक्षा उपाय हाती घ्यावे लागतील. अन्यथा  कोरोनाव्हायरसला देशातून बाहेर घालवणे कठीण आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले.

leave a reply