दक्षिण युरोपसह तुर्की व लेबेनॉनमध्ये वणवे भडकले

रोम/इस्तंबूल – अमेरिका, कॅनडा व रशियापाठोपाठ युरोपमध्येही मोठे वणवे भडकल्याचे समोर येत आहे. युरोपमधील इटली, स्पेन व ग्रीसमध्ये वणवे भडकले असून पुढील काही दिवसांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, स्वीडनमध्येही वणवे पेटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. युरोपला जोडून असलेल्या तुर्कीतही वणवे भडकले असून त्यात तीनजणांचा बळी गेला आहे. आखाती देशांमध्ये लेबेनॉन व सिरियातही वणवा भडकल्याचे वृत्त समोर आले असून, लेबेनॉनमध्ये एकाचा बळी गेल्याचे सांगण्यात येते.

दक्षिण युरोपसह तुर्की व लेबेनॉनमध्ये वणवे भडकलेस्पेनमध्ये कॅटालोनिआ व कॅसिला-ला मान्चा प्रांतात वणवे भडकले असून जवळपास चार हजार हेक्टर्स जंगल जळून खाक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. स्पेनमधील वणवे काही प्रमाणात नियंत्रणात आले असले तरी पूर्णपणे थांबले नसल्याचे स्थानिक यंत्रणांनी सांगितले. इटलीच्या सार्डिनिआ बेटावर भडकलेल्या वणव्यांमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

सार्डिनिआतील ‘ऑरिस्टानो’ प्रांतात 20 हजार हेक्टर्सहून अधिक क्षेत्रात वणवे भडकले आहेत. जवळपास दीड हजारांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असून अनेक घरे व उद्योगधंदे जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक नेते ख्रिस्तिअन सॉलिनास यांनी दिली. सार्डिनिआ प्रांतात भडकलेले वणवे अभूतपूर्व आपत्ती असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. इटलीबरोबरच ग्रीसमध्येही 24 तासांच्या अवधीत जवळपास 50 वणवे भडकल्याचे पंतप्रधान किरिआकोस मित्सोताकिस यांनी सांगितले.

दक्षिण युरोपसह तुर्की व लेबेनॉनमध्ये वणवे भडकलेतुर्कीतील तीन प्रांतांना वणव्यांचा फटका बसला असून त्यामागे घातपात असल्याचा संशय स्थानिक यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत या वणव्यांमध्ये तीन जणांचा बळी गेला असून 58 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वणवे भडकल्यानंतर 18 गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

आखाती क्षेत्रातील लेबेनॉनमध्ये सलग दोन दिवस वणवे भडकत असून आतापर्यंत 500 एकर जंगल जळून राख झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या वणव्यांमध्ये एका 15 वर्षाच्या मुलाचा बळी गेल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. अक्कर प्रांतात पेटलेला वणवा सिरियातील होम्स प्रांतातही पसरला असून सिरियन लष्कराची हेलिकॉप्टर्स वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येते. तर लेबेनॉनने वणवे विझविण्यासाठी सायप्रसचे सहाय्य मागितल्याचे सांगण्यात येते.

leave a reply