इराणसाठी संधीची खिडकी कायम खुली राहणार नाही

- अमेरिकेच्या इराणविषयक दूतांचा इशारा

संधीची खिडकीवॉशिंग्टन/व्हिएन्ना – इराण नातांझ अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन चिंताजनक प्रमाणात वाढवित आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने यावर गंभीर चिंता व्यक्त केली होती. याला काही तास उलटत नाही तोच अमेरिकेने इराणला बजावले आहे. वाटाघाटीद्वारे २०१५ सालच्या अणुकरारात परण्यासाठी इराणला दिलेली संधीची खिडकी कायमची खुली राहणार नाही, असा इशारा अमेरिकेचे विशेषदूत रॉबर्ट मॅली यांनी दिला.

जगभरातील आण्विक हालचालींवर नजर ठेवणार्‍या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दोन दिवसांपूर्वी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत काही धक्कादायक माहिती प्रसिद्ध केली. इराणच्या अणुप्रकल्पातील युरेनियमच्या संवर्धनाची निर्धारित पातळी इराणने केव्हाच पार केलेली आहे. आता त्याच्या कितीतरी पुढे जाऊन इराण युरेनियमचे संवर्धन करीत आहे व ही अत्यंत चिंताजनक बाब ठरते, असे अणुऊर्जा आयोगाने बजावले आहे. याची गंभीर दखल घेऊन अणुऊर्जा आयोगाने नातांझ प्रकल्पावरील देखरेख वाढविण्याचे जाहीर केले.

अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी जवळपास ९० टक्के संवर्धित युरेनियमची आवश्यकता असल्याचे मानले जाते. इराण अद्याप या क्षमतेच्या जवळ पोहोचलेला नाही. पण या दिशेने इराणची आगेकूच सुरू आहे, असे संकेत अणुऊर्जा आयोग देत आहे. आयोगाने ही माहिती प्रसिद्ध करून काही तास उलटत नाही तोच, अमेरिकेने इराणबरोबरच्या अणुकरारावरील वाटाघाटींसाठी नियुक्त केलेले विशेषदूत मॅली यांनी इराणला फटकारले.

संधीची खिडकी२०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी इराण आणि पाश्‍चिमात्य देशांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी नाजूक स्थितीपर्यंत येऊन पोहोचल्याची चिंता मॅली यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर अणुकरारात परतण्यासाठी इराणला दिलेली संधीची खिडकी कायमची खुली राहणार नाही, असे सांगून मॅली यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या प्रगतीची चाके उलट्या दिशेने फिरविता येणार नाही. यामुळे अणुकरारात सहभागी असलेल्या देशांसमोर फारसे पर्याय असू शकत नाही, असे सांगून एका मर्यादेबाहेर गेल्यास इराणला रोखावेच लागेल, असा संदेश दिला.

इराणमध्ये राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचे सरकार आल्यापासून व्हिएन्ना येथील वाटाघाटी स्थगित झाल्या आहेत. या काळात इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढविल्याचे समोर आले होते. व्हिएन्ना येथील वाटाघाटींबाबत वेळकाढू धोरण स्वीकारून इराण आपला अणुकार्यक्रम पुढे रेटत असल्याचा आरोप सुरू झाला आहे. यामुळे अस्वस्थ झालेल्या इस्रायलने इराणला रोखण्यासाठी हल्ल्याची जोरदार तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत.

अमेरिकेने इराणबाबत ‘प्लॅन बी’चा अवलंब करावा, कारण इराणशी वाटाघाटी करून या देशाचा अणुकार्यक्रम रोखण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत, असे इस्रायलने बजावले होते. अमेरिकेने आपल्या मागणीला प्रतिसाद दिला नाही, तर इराणवर एकतर्फी कारवाईची तयारी इस्रायलने केली आहे. गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणवरील हल्ल्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सची तरतूद करून हवाईदलाला इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ल्यांचा सराव करण्याचे आदेश दिले होते.

leave a reply