अफगाणिस्तानातील सैन्यमाघार ही अमेरिकेसाठी लाजिरवाणी बाब

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील सैन्यमाघार ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणी बाब ठरते. अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल फिरविण्यासाठी खर्च केलेले अब्जावधी डॉलर्स कामी आले, याची खात्री पटलेला चीन अमेरिकेकडे पाहून हसत आहे, असे सांगून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला संताप व्यक्त केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या कमकुवत व चुकीच्या धोरणांमुळेच अफगाणिस्तानात ही परिस्थिती ओढावली, पण बायडेन मात्र अमेरिकेने पैसे पुरवूनही अफगाणी लष्करच लढायला तयार नसल्याचे दावे ठोकत आहेत, यावरही ट्रम्प यांनी आक्षेपघेतला. अमेरिकेने अफगाणी सैन्यासाठी केलेला खर्च म्हणजे तालिबानशी लढण्यासाठी दिलेली लाच होती का? असा सवाल ट्रम्प यांनी केला आहे.

अफगाणिस्तानातील सैन्यमाघार ही अमेरिकेसाठी लाजिरवाणी बाब - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी बायडेन यांना जबाबदार धरले आहे. तसेच या सैन्यमाघारीमुळे चीन व रशिया या देशांना जबरदस्त लाभ मिळेल, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. आपला पराभव झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकीत गैरव्यवहारासाठी चीनने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आणि बायडेन यांना निवडून आणल्याचा आरोप ट्रम्प यांनी याआधी अनेकवार केला होता. या मुलाखतीत देखील त्याचा दाखला देऊन आपण केलेली गुंतवणूक कामी आली, या आनंदाच्या भरात चीन अमेरिकेकडे पाहून हसत आहे, असा जळजळीत शेरा ट्रम्प यांनी मारला.

आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असताना चीनकडून अब्जावधी डॉलर्स खेचून आणले होते. त्याच्या मोबदल्यात आपण चीनला काही मिळू दिले नाही. यानंतरही चीन अमेरिकेचे काही वाकडे करू शकला नव्हता. पण आत्ता मात्र चीन अमेरिकेकडे पाहून हसत आहे, असे टीकास्त्र सोडून ट्रम्प यांनी बायडेन यांच्या नेतृत्त्वाचा कमकुवतपणा अधोरेखित केला. अफगाणी लष्कराला अमेरिकेने केलेले सहाय्य म्हणजे तालिबानशी लढण्यासाठी दिलेली लाच होती का? प्रश्‍न प्रश्‍न विचारून ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर तोफ डागली.

अफगाणिस्तानातील सैन्यमाघार ही अमेरिकेसाठी लाजिरवाणी बाब - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्परशियाचा वार्षिक लष्करी खर्च सुमारे 50 अब्ज डॉलर्स इतका आहे. तर अमेरिकेने एकट्या अफगाणिस्तानातील मोहिमेसाठी दरवर्षी 42 अब्ज डॉलर्स खर्च केले होते. इतके करूनही अमेरिकेच्या हाती काहीही लागलेले नाही, अशी खंत ट्रम्प यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे सैन्य मायदेशी बोलावून बायडेन यांनी अफगाणी जनतेला तालिबानी लांडग्यांसमोर नेऊन ठेवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्यासारखे राजकीय विरोधकच नाही, तर एकेकाळी बायडेन यांची बाजू उचलून धरणारी माध्यमे देखील अफगाणिस्तानातील परिस्थितीसाठी बायडेन यांच्यावर टीका करीत आहेत. बायडेन यांची लोकप्रियता घसरणीला लागल्याचे दावे केले जात आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानच्या जनतेसाठी आपले हृदय पिळवटून निघत असल्याची प्रतिक्रिया दिली. प्रगतीपथावर असलेल्या अफगाणी जनतेसाठी आता भयंकर धोकादायक परिस्थिती बनलेली आहे, असा इशारा देऊन बुश यांनी अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर नाराजी व्यक्त केली. तर संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी अफगाणिस्तानातील माघारीमुळे अमेरिकेच्या जगभरातील सहकाऱ्यांना धमक्या मिळू लागल्या असून अमेरिकेवरील अविश्‍वास वाढत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेवर विश्‍वास ठेवणाऱ्यांचे अफगाणिस्तानात काय झाले ते पहा, अशा धमक्या तैवानला चीनकडून दिल्या जात आहेत. युक्रेनला देखील रशियाकडून असेच इशारे मिळत आहेत, असे सांगून हॅले यांनी अफगाणिस्तानातील अपयशामुळे अमेरिकेची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची जाणीव करून दिली.

leave a reply