चोवीस तासांत कोरोनाव्हायरसचे युरोपमध्ये १९०० बळी

रोम/पॅरिस – गेल्या चोवीस तासांत कोरोनाव्हायरसने जगभरात २,४८१ जणांचा बळी घेतला असून, यामध्ये युरोपीय देशांमधील १,९२२ जणांचा समावेश आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड या युरोपीय देशांमधील कोरोनाग्रस्तांच्या व त्याच्या बळींच्या संख्येत भयंकर वाढ झाली असून या दारुण परिस्थितीवर युरोपीय महासंघाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

या साथीचे दुसरे केंद्र ठरलेल्या इटलीमध्ये कोरोनाव्हायरसने साडेसात हजाराहून अधिक जणांचा बळी घेतला, तर याची लागण झालेल्यांची संख्या ७४,३८६ झाली आहे. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये ६८३ जण दगावले आहेत. येथील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी या साथीचा मृत्युदर मात्र भयावहरित्या वाढत असल्याचे इटलीच्या सरकारी यंत्रणा सांगत आहेत.

इटलीपाठोपाठ स्पेनमध्ये या साथीने दगावलेल्यांची संख्या चार हजारावर गेली असून, यात एका दिवसात गेलेल्या ६८३ बळींचा समावेश आहे. या साथीचा स्पेनच्या वैद्यकीय यंत्रणांवर प्रचंड ताण पडत असल्याचे दिसू लागले आहे. स्पेनने चीनकडून तब्बल ४३ कोटी युरोच्या वैद्यकीय साहित्याची खरेदी करुन या साथीचा सामना करण्याची अधिक तयारी केली आहे.

तर गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमध्ये असलेल्या फ्रान्समध्ये दिवसभरात २३१ जण दगावले. आतापर्यंत फ्रान्समध्ये १,३३१ जणांचा बळी गेला असून पंचवीस हजाराहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.

मात्र जेवढे जाहीर केले जात आहे, त्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात ही साथ फ्रान्समध्ये थैमान घालत असल्याचे एका फ्रेंच आरोग्य अधिकाऱ्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेकडे म्हटले आहे.

आतापर्यंत ब्रिटनमध्ये ४६५, नेदरलँडमध्ये ३५६, बेल्जियममध्ये २२०, स्वित्झर्लँडमध्ये १६९, तर स्वीडनमध्ये ६४ आणि पोर्तुगालमध्ये ६० जण दगावले आहेत.

leave a reply