कोरोनाव्हायरसच्या जगभरातील बळींची संख्या एक लाख पंच्याहत्तर हजारांवर

वॉशिंग्टन/लंडन (वृत्तसंस्‍था)– कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील बळींची संख्या १,७५,७३४ जण दगावले असून यापैकी एक लाख सात हजार युरोपातील आहेत तर अमेरिकेत ४३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, या साथीचे भयंकर आर्थिक दुष्परिणाम समोर येऊ लागले असून इंधनाचे दर  शून्यापर्यंत पोहोचले होते. काही काळाने यात सुधारणा झाली असली तरी घटलेली मागणी पाहता  नजीकच्या काळात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता दृष्टिपथात नाही.

गेल्या चोवीस तासात या साथीने जगभरात पाच हजार जणांचा बळी घेतला तर जवळपास ५३ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे जगभरातील या साथीच्या रुग्णांची संख्या २५ लाखांवर गेली आहे. मंगळवारी अमेरिकेत या साथीमुळे ११९७ जण दगावले असून ११,६४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या अमेरिकेत आठ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.

जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ब्रिटनमध्ये ८२८ जणांचा बळी गेला. या साथीने ब्रिटनमध्ये एकूण १७,३३७ जणांचा बळी घेतला असून या देशात एक लाख २९ हजार कोरोनाबाधित आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दबाव वाढलेल्या ब्रिटनच्या आरोग्य विभागाने खाजगी कंपन्यांना व्हेन्टिलेटर्स बनविण्याची सूचना केली आहे.

मंगळवारी कोरोनाव्हायरसमुळे इटलीत ५३४, स्पेनमध्ये ४३० आणि फ्रान्समध्ये ५३१ जणांचा बळी गेला. या साथीमुळे आर्थिक संकटात सापडलेले युरोपिय देश युरोपिय महासंघाकडे अतिरिक्त सहाय्याची मागणी करीत आहेत. महासंघाने मोठी तरतूद जाहीर करावी, असे आवाहन युरोपिय देशांकडून केले जाते.

रशियातील या साथीने आत्तापर्यंत ४५६ जण दगावले असून कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात या देशात पाच हजार नवे रुग्ण आढळले असून राजधानी मॉस्कोमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत.

कोरोनाव्हायरसची साथ उग्ररूप धारण करीत असताना, याचे भयावह आर्थिक परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. विशेषतः इंधनाची मागणी घटल्यामुळे अमेरिकेत इंधनाचे दर  शून्यापर्यंत घसरले होते. कालांतराने यात सुधारणा झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  इंधनाच्या घसरलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाकडून केली जाणारी इंधनाची आयात काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आखातातील इंधन उत्पादक देशदेखील  इंधनाच्या घसरलेल्या दरामुळे हैराण झाले असून या देशावरील आर्थिक दडपण वाढत चालले आहे.  काही आखाती देश कर्जरोखे काढून आपल्या आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत.

leave a reply