वुहान लॅबमधील संशोधिकेचे चीनच्या लष्करी वैज्ञानिकांशी संबंध – अमेरिकी वृत्तवाहिनीचा दावा

वॉशिंग्टन/बीजिंग – कोरोनाव्हायरसचा उगम असणार्‍या चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील प्रमुख संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनी चीनच्या लष्करी वैज्ञानिकांबरोबर काम केले होते व त्या लष्कराच्या संशोधन मोहिमांमध्ये सहभागी होत्या, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. ‘एनबीसी न्यूज’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात अमेरिकेच्या माजी वरिष्ठ अधिकार्‍यांचा हवाला देण्यात आला असून, त्यांनी कोरोनाव्हायरसच्या संशोधनासाठी चीनच्या लष्कराकडून अर्थसहाय्य पुरविण्यात येत होते, असा खळबळजनक आरोपही केला आहे.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर वुहान प्रयोगशाळेतील प्रमुख संशोधिका ‘शी झेंग्ली’ यांनी कोरोनाव्हायरसचा जन्म लॅबमध्येच झाल्याचे सांगून खळबळ उडविली होती. त्यापाठोपाठ कोरोनाव्हायरस हे हिमनगाचे टोक असल्याचाही दावा केला होता. मात्र त्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीने टाकलेल्या दडपणानंतर त्यांनी आपल्या दाव्यांपासून माघार घेतली होती. मात्र आता त्यांच्यासंबंधात नवी माहिती समोर आल्याने कोरोनाव्हायरसच्या निर्मितीमागे झेंग्ली यांचा हात असल्याचा संशय अधिकच बळावला आहे.

‘एनबीसी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, शी झेंग्ली यांनी चीनच्या लष्करासाठी काम करणार्‍या टॉन यिगँग व झोऊ युसेन यांच्याबरोबर लष्करी संशोधनमोहिमांवर काम केले होते. त्यातील युसेन यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. झेंग्ली यांनी चीनच्या लष्करी प्रकल्पांवरही काम केल्याचा दावा अमेरिकी वृत्तवाहिनीने केला. ‘एनबीसी न्यूज’ने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील माजी अधिकारी डेव्हिड आशर यांचा हवाला दिला आहे. आशर हे परराष्ट्र विभागासाठी कोरोनासंदर्भात ‘फॅक्ट शीट’ तयार करणार्‍या गटाचे प्रमुख होते.

कोरोनाव्हायरसच्या गोपनीय संशोधन मोहिमेला चीनच्या लष्कराने अर्थसहाय्य पुरविले होते, असे आशर यांनी म्हंटल्याचे अमेरिकी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. वुहान लॅबमध्ये काम करणार्‍या परदेशी संशोधकांनी यासंदर्भातील माहिती पुरविल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांनी सांगितल्याचेही ‘एनबीसी न्यूज’ने म्हंटले आहे. काही महिन्यांपूर्वी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या एका बातमीत, आशर यांनी कोरोनाव्हायरस वुहान लॅबमधील चिनी लष्कराच्या जैविक शस्त्रांच्या संशोधनाचा भाग होता, असा दावा केला होता.

मे महिन्यात, चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने 2015 सालीच, कोरोनाव्हायरसचा तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्रासारखा वापर करण्याची कुटील योजना आखली होती, असे खळबळ उडविणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मिळविलेल्या कागदपत्रांमधून हा खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला होता.

2019 साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिक संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले. कोरोना साथीबाबत बोलणार्‍या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. अनेक पत्रकारांनाही गायब करण्यात आले होते. चिनी संशोधिका डॉक्टर ली मेंग यांनीही कोरोना वुहान लॅबमध्ये तयार झाल्याचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध असल्याचे दावे केले होते.

leave a reply