प्रेमळ, विनम्र देश अशी चीनची प्रतिमा तयार करा – राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची राजनैतिक अधिकार्‍यांना सूचना

बीजिंग – कोरोनाची साथ पसरवून 35 लाखाहून अधिकजणांचा बळी घेणारा व जगाची अपरिमित हानी घडविणारा निर्दय देश, अशी चीनची प्रतिमा निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनच्या विरोधात पसरत असलेली ही तिरस्काराची भावना व चीनची निर्दय देश ही प्रतिमा बदलण्याची गरज चीनच्या राष्ट्राध्यक्षांना वाटू लागली आहे. म्हणूनच प्रेमळ, विनम्र अशी चीनची प्रतिमा जगभरात उभी करण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांसह कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनाही राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी यासाठी आवाहन केले आहे.

चीनची प्रतिमाचीनने अधिकाधिक मित्र बनवले पाहिजे. चीनचे मित्र असलेल्या देशांची संख्या वाढून त्यांचा विस्तार झाला पाहिजे. जे चीनला समजून घेऊ शकतात आणि चीनशी मैत्री करण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांच्याशी सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यासाठी आपल्याला आपल्या स्वरावर नियंत्रण ठेवणे भाग आहे’, असे सांगून राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांना संयम दाखवा असे सुचविले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून चीनने फिलिपाईन्ससारख्या छोट्या देशापासून ते अमेरिकेसारख्या महासत्तेलाही धमक्या देण्याचे सत्र सुरू केले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशाला चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांनी धमक्या दिल्या होत्या. तर क्वाडमधील सहभागावरून चीनच्या राजदूतांनी बांगलादेशला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या राजदूताने वापरलेल्या भाषेचे समर्थन केले होते. चीनची विस्तारवादी धोरणे या आक्रमक भाषेतून व्यक्त होत असल्याचे दिसत आहे. पण आत्ताच्या काळात मात्र चीनला अशी भाषा वापरणे परवडणार नाही, याची जाणीव राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना झालेली आहे.

कोरोनाची साथ चीनमधून जगात पसरली आणि चीनने या साथीचा शस्त्रासारखा वापर केला, असा आरोप जबाबदार विश्‍लेषक करीत आहेत. त्याला दुजोरा देणारी माहिती दर दिवशी प्रसिद्ध होत आहे. यामुळे चीनच्या विरोधात जगभरात संतापाची भावना आहे. त्याचवेळी काही देशांनी कोरोनाच्या उगमाचा तपास व्हावा, ही मागणी उचलून धरली आहे. अशा परिस्थितीत चीनला मित्रदेशांची गरज भासत आहे व म्हणूनच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांना त्यासाठी प्रयत्न करण्याचा संदेश दिला आहे.

चीनचे अभ्यासक व माजी राजनैतिक अधिकारी असलेल्या वँग ईवी यांनीही चीनने आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला दिला. कोरोनाच्या साथीमुळे पाश्‍चिमात्य जगतातील चीनची प्रतिमा धुळीला मिळालेली आहे. हे अतिशय गंभीरपणे घ्यायला हवे. चीनला महासत्ता म्हणून उदयाला यायचे असेल, तर जगाने चीनला मान्यता द्यावी लागेल. त्याखेरीज चीनच्या हातात खरी ताकद येणे शक्य नाही, असे ईवी यांनी म्हटले आहे. चीनच्या साम्यवादी तत्त्वज्ञानापासून आपल्याला फार मोठा धोका संभवतो, अशी पाश्‍चिमात्यांची धारणा आहे, याकडेही ईवी यांनी लक्ष वेधले.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केलेल्या पाहणीत सुमारे 14 देशांमध्ये चीनच्या विरोधात तिरस्काराची भावना असल्याचे उघड झाले होते. त्यातच चीनने हाँगकाँग, तैवान, झिंजियांग प्रांतातले उघूरवंशिय आणि तिबेटींबाबत स्वीकारलेल्या भूमिकेवर जगभरात नाराजी आहे. अशा परिस्थितीत चीनला मित्रदेशांची संख्या वाढवायची आहे आणि आपली प्रतिमाही सुधारायची आहे. मात्र सध्या तरी शिकारी अर्थनीतिचा अवलंब करून गरीब देशांची लुटमार करणारा व कोरोनाची साथ पसरवून जैविक युद्ध छेडणारा निर्दय देश, अशीच चीनची प्रतिमा बनलेली आहे. ती सुधारण्यासाठी चीनकडून केल्या जाणार्‍या प्रयत्नांना इतक्यात तरी यश मिळण्याची अजिबात शक्यता नाही.

leave a reply